Suresh Kalmadi passes away : एक दुःखद बातमी समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. आज दुपारी त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमित अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. पहाटे साडेतीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे. सुरेश कलमाडी यांचे पार्थिव दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यातील कलमाडी निवासस्थानी अंत्यदर्शनसाठी ठेवले जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून ते आजारपणामुळे राजकारणापासून दूर होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात देखील उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. शरद पवार यांनी सुरेश कलमाडी यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. सुरेश कलमाडी यांच्याविषयी.. केंद्रात काँग्रेस पक्षाची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते. पुण्याच्या राजकारणात त्यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग होता. या कारणामुळे कलमाडी हे अनेक वर्ष पुण्याचे खासदार राहिले होते. सुरेश शामराव कलमाडी असे त्यांचे पुर्ण नाव असून त्यांच्या जन्म १ मे १९४४ रोजी झाला. सुरेश कलमाडी भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष होते आणि 2010 च्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन समितीचे अध्यक्ष होते. मात्र, या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. ज्यामुळे त्यांना अटकही झाली होती, परंतु खटला अद्याप सुरू झालेला नाही. या प्रकरणानंतर कलमाडी यांचे राजकारणातील प्रस्थ कमी व्हायला सुरूवात झाली. परिणामी त्यांच्या राजकारणाला उतरली कळा लागली. अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर एप्रिल 2025 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने ईडीने या प्रकरणी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर त्यांना क्लीन चिट मिळाली होती. मात्र, त्यानंतर सुरेश कलमाडी हे पुण्याच्या राजकारणात कमबॅक करु शकले नाहीत. हेही वाचा : Pune: पूनम विधाते यांच्या बरोबर महिला संघटनेची ताकद