पाटणा – माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांच्या कन्या आणि नेमबाज श्रेयसी सिंह यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बिहार निवडणुकीपूर्वी त्यांनी हा पक्ष प्रवेश केला आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे नेते दिग्विजय सिंह हे कॉंग्रेसमध्ये होते. त्यांनी रेल्वे, अर्थ, परराष्ट्र मंत्रायलायची जबाबदारी सांभाळली होती. 2010 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर आता त्यांच्या कन्येने म्हणजेच श्रेयसी सिंहने भाजपात प्रवेश केला आहे.
श्रेयसी ही राष्ट्रीय स्तरावरची नेमबाज आहे. 2018च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने सुवर्णपदकही पटकावले होते. 2014मध्ये श्रेयसी यांच्या आई पुतुलदेवी या भाजपाच्या तिकिटावर लोकसभा पोटनिवडणूक लढल्या. 2019मध्ये ही जागा जदयूकडे गेल्याने त्या नाराज झाल्या आणि अपक्ष निवडणूक लढली.
त्यामुळे भाजपाने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. त्यानंतर श्रेयसी राजकारणात येईल असा अंदाज वर्तवला होता. श्रेयसी राजदमध्ये सहभागी होईल अशी शक्यता होती. मात्र तिने भाजपात प्रवेश केला आहे.