खांडके गावचे माजी सरपंच यांचे सदस्य पद अपात्र

नगर – तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या खांडके ग्रामपंचायतीचा माजी सरपंच व सध्या विद्यमान सदस्य असणारे पोपट सोन्या बापू चेमटे यांना ग्रामपंचायतीच्या सदस्य पदावरून अपात्र करण्याचा निर्णय नुकताच जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी घोषित केला आहे.
खांडके येथील सरपंच पोपट सोन्याबापू चेमटे यांनी गावातील ग्रामपंचायतीच्या रकमांचा भ्रष्टाचार करून अपहर केल्यामुळे त्याचे विरोधात गावातील नागरिकांनी तक्रारी केलेल्या होत्या. सदरच्या तक्रारीच्या चौकशी होऊन आयुक्त नाशिक यांनी सदरील पोपट सोन्या बापू चेमटे यांना ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 39 (1 ) प्रमाणे सरपंचपदावरून काढून टाकलेले होते. मात्र सदरील पोपट सोन्याबापु चेमटे यांचे ग्रामपंचायतीचे सदस्य पद कायम राहिले होते.
त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीप्रमाणे किरण यमाजी चेमटे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचेकडे अॅड. गोरक्ष पालवे यांचे मार्फत विवाद अर्ज सादर करून पोपट चेमटे यांना आयुक्तांनी पदावरून काढून टाकलेले असल्यामुळे त्यांना सदस्य पदावर अपात्र करावे, अशी मागणी केली होती.
या मागणीच्या आधारे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सुनावणी घेऊन पोपट सोन्याबापू चेमटे यांना दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून ग्रामपंचायतीचे सदस्य पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घोषित केला आहे. किरण यमाजी चेमटे या तक्रारदाराच्या वतीने अॅड. गोरक्ष पालवे यांनी कामकाज पाहिले. त्यांना अॅड. रोहित बुधवंत गुरविंदर पंजाबी, सागर गरजे, धनश्री खेतमाळीस, बाळकृष्ण गीते, राहुल दहिफळे, विवेक बडे, राहुल वांढेकर, प्रवीण निंबाळकर, पुष्कराज बिडवाई, तेजस राख यांनी सहाय्य केले.





