Sangli News : सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांचा गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयात उपचार सुरू

सांगली : सांगली येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी महापौर सुरेश आदगोंडा पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर सुरेश पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू करण्यात आले आहेत. मात्र सुरेश पाटील यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
सुरेश पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरीच साडीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची प्राथमिक नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. सुरेश पाटील यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले यावरून तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.
पाटील हे गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून सांगलीच्या राजकारणात सक्रिय आहेत. राजकारणासह व्यापार, शिक्षणक्षेत्र आणि समाजकारणात सुरेश पाटील यांना आदराचे स्थान आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरेश पाटील राजकारण तसेच सार्वजनिक कार्यक्रमांपासून अलिप्त राहत होते.





