Rodrigo Duterte : फिलिपीन्सचे माजी अध्यक्ष दुतेर्ते महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी

मनिला : फिलिपीन्सचे पदच्युत अध्यक्ष रॉड्रीगो दुतेर्ते हे दावाओ शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत. दुतेर्ते विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्याचे दावाओ निवडणूक मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत निकालामध्ये स्पष्ट झाले आहे. त्यांना तब्बल ६ लाख ६० हजार मते मिळाली. त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जवळपास आठपट जास्त मते त्यांना मिळाली आहेत.
दुतेर्ते याना सध्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या अनुपस्थितीतच या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्यावर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. दुतेर्ते यांचे धाकटे पुत्र सबास्टियन हे दावाओ शहराचे महापौर होते. आता ते शहराचे उपमहापौर म्हणून निवडले गेले आहेत. तर दुतेर्ते यांचे थोरले चिरंजीव पावलो यांची प्रतिनिधीगृहाचे सदस्य म्हणून फेरनिवड करण्यात आली.
याशिवाय दुतेर्ते यांचे दोन नातू देखील या निवडणुकीत विजयी झाले आहेत. दावाओ शहराच्या राजकारणावर दुतेर्ते यांच्या कुटुंबीयांचाच प्रभाव अजूनही असल्याचे यामुळे स्पष्ट झाले. दुतेर्ते यांची कन्या आणि देशाच्या उपाध्यक्षा सारा दुतेर्ते यांना भ्रष्टाचार आणि पदाचा गौरवापर करण्याच्या आरोपांवरून जुलै महिन्यात महाभियोगाला सामोरे जावे लागणार आहे. सिनेटमध्ये दोषी आढळल्यास त्यांना निवडणुकीसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते.





