Vaibhav Naik : ठाकरे गटाचा बडा नेता ACBच्या रडारवर; काय आहे प्रकरण जाणून घ्या…
Vaibhav Naik : वैभव नाईक यांनी 2002 आणि 2006 या कालावधीत संबंधित गाळ्यांची खरेदी केली होती. त्यांच्या मालमत्तेची चौकशी 2022 पासून रत्नागिरी एसीबी कार्यालयामार्फत सुरू असून या तपासाचा भाग म्हणून विविध कागदपत्रे आणि व्यवहारांची पडताळणी केली जात आहे.

Vaibhav Naik : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते व माजी आमदार वैभव नाईक यांच्या कथित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातील चौकशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कणकवली नगरपंचायतीकडे पत्र पाठवून नाईक यांनी खरेदी केलेल्या गाळ्यांबाबत सविस्तर माहिती मागविली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कणकवली शहरातील दोन गाळ्यांच्या खरेदी व्यवहारासंदर्भात एसीबीने चौकशी सुरू ठेवली असून, संबंधित गाळे प्रत्यक्षात एक आहेत की दोन, याबाबतची माहिती नगरपंचायतीकडून मागविण्यात आली आहे. यासाठी एसीबीच्या पोलीस उपअधीक्षकांनी कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, वैभव नाईक यांनी 2002 आणि 2006 या कालावधीत संबंधित गाळ्यांची खरेदी केली होती. त्यांच्या मालमत्तेची चौकशी 2022 पासून रत्नागिरी एसीबी कार्यालयामार्फत सुरू असून या तपासाचा भाग म्हणून विविध कागदपत्रे आणि व्यवहारांची पडताळणी केली जात आहे.
चौकशीला पूर्वीही विरोध नव्हता आणि आताही नाही – (Vaibhav Naik )
दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना वैभव नाईक यांनी चौकशीला आपला कोणताही विरोध नसल्याचे स्पष्ट केले. “2022 पासून एसीबीकडून चौकशी सुरू आहे. चौकशीला पूर्वीही विरोध नव्हता आणि आताही नाही. गेल्या काही वर्षांत माझ्याशी संबंधित अनेक व्यक्तींची चौकशी करण्यात आली, त्यांचे जबाब नोंदविण्यात आले. अधिकारी बदलतात, राजकीय परिस्थिती बदलते आणि पुन्हा चौकशा सुरू होतात. मात्र, हे माझ्यावर अन्यायकारक आहे,” असे ते म्हणाले.

Vaibhav Naik : ठाकरे गटाचा बडा नेता ACBच्या रडारवर; काय आहे प्रकरण जाणून घ्या…
“कोणत्याही चौकशीला आम्ही सामोरे जाणार आहोत. कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. एसीबीकडून एखाद्या व्यक्तीची पाच-पाच वर्षे चौकशी सुरू राहणे योग्य नाही. माझ्यासोबत सुरू झालेल्या अनेक चौकशा बंद झाल्या आहेत, मात्र केवळ माझीच चौकशी सुरू आहे. हा माझ्यावर अन्याय असून त्याविरोधात मी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा देणार आहे,” असेही नाईक यांनी सांगितले.
या प्रकरणातील पुढील चौकशी आणि एसीबीकडून मागविण्यात आलेल्या माहितीनंतर तपासाला कोणते वळण मिळते, याकडे सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





