नाशिक : इगतपुरी मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांना घराजवळ नातवासोबत फेरफटका मारत असताना पाठीमागून येणाऱ्या चारचाकी कारने उडविले आहे. या अपघातात निर्मला गावित गंभीर जखमी झाल्या आहेत. नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल सोमवारी झालेल्या अपघातातील या घटनेचा थरारक व्हिडिओ आज समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, कारने अगदी पाठीमागून त्यांना उडवल्याचं व्हिडिओ पाहायला मिळत आहे. निर्मला गावित यांचा अपघात होऊन 24 तास उलटले तरीही अद्याप वाहनचालक मोकाटच आहे. कायद्याचा बालेकिल्ला बिरुदावली मिळविणारे नाशिक पोलीस काय करत आहेत, असा सवाल गावित यांच्या कन्या नयना गावीत यांनी विचारला आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली आहे. निर्मला गावित या दोनवेळा आमदार राहिल्या आहेत. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर, शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.