भाजपला आणखी एक धक्का ! ‘हा’ माजी आमदार करणार काँग्रेसमध्ये घरवापसी

गोंदिया : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 2019 मध्ये त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता ते परत काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. येत्या 13 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आज त्रकार परिषद घेत त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, आता दिल्लीवरून त्यांच्या पक्ष प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाला असल्याचे समोर आले आहे.
गोपाल अग्रवाल हे काँग्रेसकडून 2 वेळा विधानपरिषद तर 3 वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. मात्र 2019 निवडणुकीदरम्यान त्यांनी मोदी लाटेत भाजप प्रवेश केला होता. त्यांना भाजपने उमेदवारी ही दिली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते भाजपात अस्वस्थ होते. अखेर आज त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून लवकरच काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत.





