मुंबई : माजी मंत्री सुरेश जैन यांना न्युमोनियाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने उपचारांसाठी मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुरेश जैन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
सुरेश जैन यांना शुक्रवारी मध्यरात्री श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. यानंतर जैन यांना पुढील उपचारांसाठी तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित उपचार सुरु असल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीने मुंबईत हलवण्यात आले.
ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच घरकुल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन यांना उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला होता. त्यानंतर ते प्रथमच जळगावमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व असे स्वागत केले होते.
जळगावमधील गाजलेल्या घरकुल घोटाळा प्रकरणी सुरेश जैन यांच्यासह इतरांना धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा आणि दंड ठोठावला होता. सुरेश जैन यांना सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सुरेश जैन हे पाच वर्ष कारागृहात होते. याच दरम्यान प्रकृती अस्वस्थ्यामुळे जैन यांना यापूर्वी साल 2019 मध्ये वैद्यकीय जामीन मंजूर झाला होता. मात्र जळगाव जिल्ह्यात येण्यास त्यांना बंदी घालण्यात आली होती. परंतु हाच जामीन नियमित झाल्यामुळे देशभरात सुरेश जैन यांना कुठेही फिरता येणार आहे. त्यानंतर ते जळगावात दाखल झाले होते.