जम्मू-काश्मीर: निवृत्त डीएसपीच्या घराला आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू

कठुआ – जम्मू काश्मिरच्या कठुआमध्ये एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी भीषण आग लागली. मध्यरात्री गाढ झोपेत असताना लागलेल्या या आगीमध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कठुआ येथील शिवानगरमध्ये एका घराला मध्यरात्री लागलेल्या आगीत घरातील बहुतांश जण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घरामध्ये 9 जण झोपलेले असताना आग लागली अन् ही भयंकर घटना घडली. जखमी झालेल्या सर्वांवर कठुआ येथील जीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गंगा भगत (वय 17), दानिश भगत (वय 15 ), अवतार कृष्ण (वय 81), बरखा रैना (वय 24), तकश रैना (वय 3) अद्विक रैना (वय 4) अशी या दुर्घटनेत मरण पावलेल्यांची नावे आहेत. यामध्ये आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आलेला शेजारीही गंभीर जखमी झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.





