DDCA President Election 2024 | रोहन जेटली सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष, कीर्ती आझाद यांचा पराभव…

DDCA President Election 2024 | रोहन जेटलींनी डीडीसीए निवडणुकीत पुन्हा एकदा झेंडा फडकवला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा पराभव करून त्यांनी आपले अध्यक्षपद कायम ठेवले आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून रोहन यांची ही सलग दुसरी टर्म असेल. निवडणुकीत एकूण 2,413 मते होती, त्यापैकी रोहन यांनी 1577 मते मिळवून विजय मिळवला तर कीर्ती आझाद यांना केवळ 777 मतांवर समाधान मानावे लागले.
13, 14 आणि 15 डिसेंबरला DDCA च्या निवडणुका झाल्या होत्या. मंगळवार 17 डिसेंबर रोजी मतमोजणी झाली आणि अध्यक्ष पुन्हा निवडण्यासाठी किमान 1207 मतांची आवश्यकता होती. यापूर्वी रोहन जेटली यांच्या प्रशासनात काम केलेल्या अनेक सदस्यांनाही अनेक मोठी पदे राखण्यात यश आले आहे.
राकेश कुमार बन्सल आणि सुधीर कुमार यांचा मोठ्या फरकाने पराभव करत शिखा कुमार डीडीसीएच्या उपाध्यक्षपदी निवडून आल्या. सचिवपदासाठी अशोक कुमार विजयी झाले असून हरीश सिंगला खजिनदारपदी विराजमान होणार आहेत. त्यांच्याशिवाय विजयी अमित ग्रोव्हरही संयुक्त सचिवपदाची सूत्रे हाती घेतील.
कीर्ती आझादने जेटलींवर केले होते गंभीर आरोप…
तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कीर्ती आझाद यांनी रोहन जेटली यांच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. गेल्या आर्थिक वर्षात डीडीसीएला BCCI कडून 140 कोटी रुपये मिळाले, पण त्यातील फारच कमी पैसे खर्च झाले, असा आरोप त्यांनी केला होता. आरोपांची मालिका करत त्यांनी असेही सांगितले की, रोहन जेटली यांच्या नेतृत्वात दिल्लीतील स्टेडियममध्ये फ्लडलाइट्स बसवण्यासाठी 17.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले, मूळात फ्लडलाइट्स बसवण्यासाठी 7.5 कोटी रुपये खर्च आला होता. पीटीआयनुसार, आझाद म्हणाले की, डीडीसीएने 8 लिफ्ट तयार करण्यासाठी 19 कोटी रुपये खर्च केले होते.

