प्रभात वृत्तसेवा श्रीरामपूर – शहरातील किशोर टॉकीज परिसरात शुक्रवारी रात्री ५ ते ६ अनोळखी इसमांनी माजी नगरसेवक दीपक बाळासाहेब चव्हाण (वय 44, रा. बाजारतळ, श्रीरामपूर) यांना मारहाण करून सोन्याची चेन लुटल्याची घटना घडली आहे.चव्हाण हे कामानिमित्ताने भगतसिंग चौकातील मित्र रवि रमेश पाटील यांच्या घरी गेले होते. रात्री सुमारे १०.३० वाजता परतताना गिरमे चौक मार्गे किशोर टॉकीजसमोर आले असता, तीन मोटारसायकलवरून आलेल्या ५-६ अनोळखी इसमांनी त्यांचा पाठलाग करून रस्ता अडवला. जातीवाचक शिवीगाळ करत चव्हाण यांना मोटारसायकलवरून ओढून खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावून घेतली. तसेच “तू जर सुधारलास नाहीस तर कायमचा काटा काढू,” असे म्हणून सर्व 5-6 अनोळखी इसम तेथून निघून गेले. घटनास्थळावरून आरोपी पसार झाले असून, जखमी चव्हाण यांनी मित्रांना माहिती दिल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणले. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात ५-६ इसमांविरुद्ध तक्रार नोंदवली असून तपास सुरू आहे.