हैदराबाद – येथील कॉंग्रेसचे माजी खासदार नंदी येल्लया यांचे आज करोनाने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. 29 जुलैला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी त्यांना करोना झाल्याचे निदान झाले होते. तेलंगणाचे आरोग्यमंत्री ई राजेंद्र, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि अन्य नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. येल्लया हे एकूण सहा वेळा लोकसभेवर निवडून आले होते. त्यातील पाच वेळा ते सिद्दीपेट मतदार संघातून विजयी झाले होते तर एकदा त्यांनी नगर कर्नुल मतदार संघातून विजय मिळवला होता. त्यांना दोन वेळा राज्यसभेतही संधी मिळाली होती. तेलंगणातील कॉंग्रेसचे एक प्रभावशाली नेते म्हणून त्यांची ओळख होती.