भाजपच्या माजी खासदार आणि अभिनेत्री रुपा गांगुली यांना कोलकाता पोलिसांकडून अटक

बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या टीव्ही मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारणाऱ्या रुपा गांगुली यांनी अटक करण्यात आली आहे. त्या माजी राज्यसभा सदस्य आहेत. सध्या त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. स्थानिक महिला भाजप नेत्या रुबी दास यांच्या सुटकेच्या मागणीसाठी रुपा गांगुली या पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करत होत्या. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली.
काय आहे नेमके प्रकरण?
बुधवारी सकाळी ( २ऑक्टोबर ) कोलकाता येथे इयत्ता नववीमधील एक विद्यार्थी कोचिंग सेंटरला जात होता. याच परिसरात रस्त्याचं काम देखील चालू होतं. या विद्यार्थ्याला जेसीबीने धडक दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर प्रभाग क्रमांक ११३ च्या स्थानिक नगरसेवक अनिता कर मजुमदार या परिसरात उपस्थित राहिल्या नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली. यानंतर रस्त्यावर निदर्शने सुरू झाली.
यावेळी भाजप नेत्या रुबी मोंडल यांच्यासह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली. या निषेधार्थ बुधवारी रात्री रुपा गांगुली यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी बांसद्रोणी पोलीस स्थानक गाठलं. रुपा गांगुली यांनी पोलीस स्थानक गाठल्यावर रुबी मोंडलसह अन्य कार्यकर्त्यांना अटक केली मात्र, विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे आरोप केले.
तसेच विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी संबंधित आरोपींना अटक होईपर्यंत स्टेशन बाहेर बसून राहणार असंही त्या म्हणाल्या होत्या. या प्रकरणी रूपा गांगुली यांनी निषेध व्यक्त केला. बुधवारी रात्रीपासून त्या बांसद्रोणी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करत होत्या. यानंतर गुरुवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे.
रूपा गांगुली यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत काम केले आहे. ‘महाभारत’मध्ये साकारलेल्या द्रौपदीच्या भूमिकेने त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. नंतर त्या भाजपमध्ये दाखल झाल्या आणि राज्यसभा सदस्यही झाल्या.





