ढाका : बांगलादेशातील सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी माजी पंतप्रधान आणि बीएनपी पक्षाच्या प्रमुख खालेदा झिया यांची भ्रष्टाचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. उच्च न्यायालयाने सुनावलेली १० वर्षांची शिक्षेचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. उच्च न्यायालयाच्या निकालाचा फेरआढावा घेण्याची मागणी करणारी याचिका झिया यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना बांगलादेशचे सरन्यायाधीश डॉ. सईद रफात अहमद यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने झिया ऑर्फनेज ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात झिया आणि त्यांच्या पक्षाचे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान आणि इतर सर्व संशयितांना निर्दोष मुक्त केले. हे प्रकरण सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. झिया ऑर्फनेज ट्रस्टच्या नावाने सरकारी निधीचा अपहार केल्याबद्दल ढाक्यातल्या विशेष न्यायालयाने झिया यांना ८ फेब्रुवारी २०१८ रोजी ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. तर अन्य ५ जणांना १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली गेली होती. यामध्ये झिया यांचे पुत्र तारिक आणि माजी मुख्य सचिव कमाल उद्दीन सिद्दीकी यांचाही समावेश होता. प्रत्येक आरोपीला १ कोटी टका इतका दंडही ठोठावला गेला होता. या आरोपींपैकी तारिक, सिद्दीकी आणि झिया उर रेहमान यांचा भाचा मोमिनूर रहमान हे फरार आहेत. झिया यांना सत्र न्यायालयाने सुनावलेली ५ वर्षांची उच्च न्यायालयाने वाढवून १० वर्षे केली होती. त्या निकालाला झिया यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.