ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या प्रमुख खालिदा झिया यांना भ्रष्टाचार प्रकरणात निर्दोष ठरवण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. सरन्यायाधीश मोहम्मद अशफाकूल इस्लाम यांच्या नेतृत्वाखालील ३ सदस्यीय आव्हान विभागीय पीठाने सरकार आणि भ्रष्टाचार विरोधी आयोगाने उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात दाखल केलेली आव्हान याचिका फेटाळून लावली. याच झिया चॅरिटेबल ट्रस्ट भ्र्ष्टाचार प्रकरणात झिया यांना 2018 साली ढाक्यातील कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवून 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती. झिया यांना 10 लाख टका इतका दंडही ठोठावण्यात आला होता. गेल्या वर्षी झिया आणि दोषी ठरवलेल्या अन्य दोघांच्या आव्हान याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने या सर्वांना निर्दोष ठरवले होते. निर्णयाला सरकार आणि एसीसीने स्रर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हे प्रकरण भ्रष्टाचार विरोधी आयोगाने 2011 मध्ये दाखल केले होते. खालिदा झिया आणि अन्य तिघांच्या विरोधात सत्तेचा दुरुपयोग करून ट्रस्टसाठी अज्ञात स्रोतांमधून पैसा जमवल्याचा आरोप करण्यात आला होता. झिया आता झिया अनाथालय ट्रस्ट आणि झिया चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही प्रकरणात निर्दोष ठरल्या आहेत. गेल्या वर्षी बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या आदेशांवरून झिया यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.