Sanjay Raut – कोणी काकाचा तर कोणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरत आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे. तसेच नार्वेकरांच्या निकाला विरोधात १६ जानेवारीला उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात जनतेत संतापाची लाट उसळलेली आहे. देशातील इतिहासातील जनतेसमोर होणारी ही पहिली खुली पत्रकार परिषद असेल. त्यामुळे या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तसेच आमचा पक्ष, कार्यकर्ते जागेवर आहेत, म्हणूनच उद्धव ठाकरे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दौरे करत आहेत. मुख्यमंत्री काहीही बोलत असतील. मात्र त्यांनी हिंमत असल्यास स्वतःचा पक्ष स्थापन करून दाखवावा आणि सांगावे की होय मी एकनाथ शिंदे, हे मी निवडून आणलेले उमेदवार आणि हा माझा पक्ष आहे. असं राऊत म्हणाले.