Blue Pasta: व्हाइट अन् रेड सॉस विसरा! आता ट्राय करा निळ्या रंगाचा गार्लिक-बटर पास्ता
Blue Pasta गार्लिक आणि बटरच्या स्वादाने तयार होणारा हा पास्ता तुमच्या जेवणाच्या ताटाला एक वेगळाच लुक देऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया या हटके ब्लू पास्त्याची सोपी रेसिपी.

Blue Pasta: पास्ता म्हटलं की डोळ्यांसमोर व्हाइट सॉस, रेड सॉस किंवा मसालेदार पास्ता येतो. पण तुम्ही कधी निळ्या रंगाचा पास्ता पाहिला आहे का? होय, अगदी निळ्या रंगाचा पास्ता! दिसायला जितका आकर्षक आणि हटके आहे, तितकाच तो बनवायलाही सोपा आहे. विशेष म्हणजे या पास्त्याला निळा रंग देण्यासाठी कोणताही कृत्रिम रंग वापरला जात नाही. तर अपराजिता म्हणजेच शंखपुष्पीच्या फुलांचा वापर केला जातो. गार्लिक आणि बटरच्या स्वादाने तयार होणारा हा पास्ता तुमच्या जेवणाच्या ताटाला एक वेगळाच लुक देऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया या हटके ब्लू पास्त्याची सोपी रेसिपी.
ब्लू पास्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य
ब्लू पास्ता बनवण्यासाठी फार काही वेगळे साहित्य लागत नाही. घरातील नेहमीच्या पदार्थांपासून तुम्ही ही रेसिपी सहज तयार करू शकता.
- २०० ग्रॅम पास्ता
- १२ ते १५ सुकवलेली अपराजिताची फुले
- २ मोठे चमचे अनसॉल्टेड बटर
- ३ लसूण पाकळ्या
- पाव चमचा कुटलेली काळी मिरी
- चवीनुसार मीठ
- सजावटीसाठी ताजी बेसिलची पाने
Blue Pasta
असा बनवा निळ्या रंगाचा पास्ता
१. अपराजिताच्या फुलांपासून तयार करा निळे पाणी
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात पुरेसे पाणी घ्या. त्यामध्ये चवीनुसार थोडे मीठ घाला. आता या पाण्यात १२ ते १५ सुकवलेली अपराजिताची फुले टाका. साधारण तीन मिनिटे हे पाणी उकळू द्या. हळूहळू फुलांचा निळा रंग पाण्यात उतरू लागेल. त्यामुळे पाण्याला गडद निळा रंग येईल. पाण्याला छान रंग आल्यानंतर फुले बाहेर काढून घ्या.
२. निळ्या पाण्यात शिजवा पास्ता
आता तयार झालेल्या निळ्या पाण्यात पास्ता घाला. पास्ता साधारण ९० टक्के शिजेपर्यंत उकळू द्या. पास्ता खूप मऊ होणार नाही, याची काळजी घ्या. कारण जास्त शिजल्यास त्याची चव आणि पोत दोन्ही बदलू शकतात. पास्ता शिजल्यानंतर तो गाळून घ्या. मात्र, उरलेले थोडे निळे पाणी बाजूला ठेवायला विसरू नका. पुढील प्रक्रियेत या पाण्याचा उपयोग होणार आहे.
३. तयार करा गार्लिक-बटरचा स्वाद
आता एका मोठ्या पॅनमध्ये दोन चमचे बटर गरम करा. बटर वितळल्यानंतर त्यात बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या घाला. मंद आचेवर लसूण हलका परतून घ्या. लसूण जास्त तपकिरी होणार नाही, याची काळजी घ्या. कारण लसूण जास्त भाजल्यास त्याची चव कडवट होऊ शकते. यानंतर त्यात कुटलेली काळी मिरी घाला.
४. पास्ता आणि सॉस एकत्र करा
आता या गार्लिक-बटरच्या मिश्रणात शिजवलेला निळ्या रंगाचा पास्ता घाला. त्यामध्ये आवश्यकतेनुसार बाजूला ठेवलेले निळे पाणी मिसळा. सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करा. मंद आचेवर एक ते दोन मिनिटे पास्ता शिजू द्या. त्यामुळे बटर, लसूण आणि काळी मिरी यांचा स्वाद पास्त्यामध्ये छान मिसळेल. यानंतर गॅस बंद करा.
असा करा सर्व्ह!
तुमचा हटके ब्लू पास्ता आता तयार आहे. हा पास्ता एका सुंदर प्लेटमध्ये काढा. त्यावर ताजी बेसिलची पाने आणि थोडी कुटलेली काळी मिरी घालून सजवा. दिसायला आकर्षक आणि चवीला वेगळा असलेला हा पास्ता तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डिनरसाठी तयार करू शकता.
विशेष म्हणजे अपराजिताच्या फुलांमुळे पास्त्याला नैसर्गिक निळा रंग मिळतो. त्यामुळे नेहमीच्या पास्त्यापेक्षा ही रेसिपी नक्कीच वेगळी ठरते. घरी काहीतरी नवीन आणि हटके बनवण्याचा विचार करत असाल, तर ब्लू पास्त्याची ही रेसिपी एकदा नक्की करून पाहा. अपराजिताची फुले स्वच्छ आणि खाद्यपदार्थांसाठी योग्य असल्याची खात्री करूनच वापरा.





