महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली साशंकता काल पुन्हा दूर झाली आहे. परवा कर्नाटकचा निकाल आला. त्यात कॉंग्रेसचा एकतर्फी विजय आणि भाजपचा पराभव या बाबींमुळे भुसभुशीत होऊ लागलेल्या महाविकास आघाडीत पुन्हा जान आली आहे. ही आघाडी मजबूत करण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला ही त्यातील विशेष बाब. अन्यथा पवार आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांच्या वर्तणुकीमुळेच ही आघाडी टिकते की फुटते अशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले होते. शरद पवारांची भाजपला अनुकूल पावले पडत असल्याची चिन्हे निर्माण झाल्यानंतर कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस ही भाजपची “बी’ टीम असल्याचे स्पष्ट वक्तव्य केले होते. पवारांच्या नव्याने प्रकाशित झालेल्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीत उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेबद्दलही पवारांनी नाराजीचे सूर काढल्यानंतर ठाकरे गटाच्या संजय राऊत यांच्याकडूनही त्यावर कडवट प्रतिक्रिया आली होती. शरद पवारांची गौतम अदानींशी झालेली बंद दाराआडची चर्चाही महाविकास आघाडीत चलबिचल निर्माण करणारी ठरली होती. दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना उद्देशून त्यांनी आमच्यात चोंबडेपणा करू नये, अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती. राऊत यांची मध्यंतरी अजित पवारांनीही कडक शब्दांत कानउघाडणी केली होती. या साऱ्या एकामागोमाग एक पद्धतीने घडलेल्या घटनांमुळे महाविकास आघाडीचा बोऱ्या वाजणार की काय अशी चर्चा सुरू झाली. पण कालच्या शरद पवारांनी घेतलेल्या एका बैठकीमुळे सारे संभ्रम दूर होण्यास मदत झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला महाविकास आघाडीबरोबरच राहण्यात स्वारस्य आहे, असा संदेशही यातून मिळाला हे बरे झाले. एका कर्नाटकच्या निकालाने हे सारे फासे सुलटे पडू लागले आहेत. विरोधकांच्या आघाडीसाठी हे शुभसंकेतच मानले गेले असतील. तिकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भाजपच्या विरोधात प्रखर बोलताना सातत्याने अडखळत असणारी जीभ संभ्रमाच्या वातावरणात भरच घालत होती. भाजपच्या विरोधात अत्यंत खमकी भूमिका ते का घेत नसावेत असाही एक प्रश्न चर्चेत होता. खरे पाहता त्यांना त्यांच्या काही व्यक्तिगत अडचणींमुळे भाजपच्या विरोधात प्रखर आणि कडवी भूमिका घेण्यात अडचण असेल तर त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद सोडून द्यावे आणि ते पक्षातल्याच अन्य कोणाला तरी द्यावे, अशी मागणीही पुढे येईल काय अशी शक्यता होती. पण काल झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी आपली वज्रमूठ कायम ठेवण्याचा निर्णय अजित पवारांच्याच उपस्थितीत घेतला आहे. ही सर्वांची प्रामाणिक इच्छा असावी असाही संदेश त्यातून दिला गेला आहे. देशाच्या राजकारणात महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. विधानसभेच्या निवडणुकी आधीही लोकसभा निवडणुका होणार असून महाराष्ट्रात लोकसभेच्या ज्या 48 जागा आहेत त्यावर केंद्रातील सरकारचे भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, ही वस्तुस्थिती आहे. महाविकास आघाडी अशीच शेवटपर्यंत एकजूट राहिली तर भाजपला मोठे आव्हान निर्माण करण्यात ती यशस्वी ठरू शकते. या तिन्ही पक्षांच्या एकजुटीपुढे बालेकिल्ल्यातही भाजपची धडगत लागू शकत नाही हे सर्वांनीच कसबा पोटनिवडणुकीतील निकालाच्यावेळी पाहिले आहे. हाच ट्रेंड लोकसभेच्या 48 जागांमध्ये कायम राहू शकतो आणि तसे झाले तर मात्र महाराष्ट्रातून भाजपला अपेक्षित असलेली रसद मिळण्यात अडचण येऊ शकते. मविआची ही वज्रमूठ कायम राहिली तर भाजपला महाराष्ट्रात लोकसभेचीच नव्हे, तर विधानसभेची निवडणूकही जड जाऊ शकते हे सांगायला कोणा निवडणूक तज्ज्ञांची गरज भासणार नाही. मुद्दा फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपसात ताळमेळ राखण्याचा होता. महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी आज काहीही सांगता येत नाही, असे विधान जेव्हा दस्तुरखुद्द शरद पवार करतात तेव्हा ही एकजूट कायम राहावी असे पवारांच्याच मनात नाही काय, अशी शंका निर्माण होऊ लागते. पण नंतर स्वत: पवार यांनीच ती चूक दुरूस्त केली. अजून जागावाटप ठरले नसल्याने मी तसे बोललो, असा खुलासा त्यांनी केला होता. त्यांनी हा खुलासा करून बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी आपल्या अशा प्रकारच्या थेट विधानामुळे मविआची नौका भरकटू शकते याचा त्यांना अंदाज आला नसावा, असे म्हणता येणार नाही. पण कर्नाटकच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्याच निवासस्थानी मविआच्या नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन जो एक विधायक संदेश दिला आहे, तो शेवटपर्यंत टिकला पाहिजे अशीच मविआ समर्थकांची इच्छा असणार. विरोधी पक्षांच्या या आघाडीत शिवसेनेचा ठाकरे गट हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. तोच महाविकास आघाडीच्या विजयाचा खरा शिल्पकार असणार, असा आजचा राजकीय रागरंग आहे. त्यामुळे अधूनमधून भाजपमध्येही ठाकरे गटाशी पुन्हा जुळवून घेण्याचा मतप्रवाह निर्माण झाल्याच्या बातम्या येत असतात; परंतु आता ती शक्यता जवळपास मावळली आहे. भाजप जुळवून घेण्यास तयार असली तरी आता ठाकरे गट त्यांच्याशी जुळवून घेण्याची शक्यता नाही ही बाबही पुरेशा प्रकर्षाने स्पष्ट झाली आहे. त्यातच परवा उद्धव ठाकरे यांना धडा शिकण्यासाठीच आम्ही पहाटेच्या शपथविधीचा घाट घातला होता, असे विधान करून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा ही युती होण्याची शक्यता पूर्णपणे मावळून टाकली आहे. ही सारी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिका आता वादातीतपणे स्पष्ट झाल्या आहेत असे म्हणता येते. कॉंग्रेस भाजपशी जुळवून घेण्याची अजिबात शक्यता नसते. त्यामुळे “सर्कल ईज कम्प्लीट ऍन्ड पिक्चर ईज क्लिअर’ अशा स्थितीत महाविकास आघाडीचे राजकारण येऊन ठेपले आहे. मुंबईत महाविकास आघाडीची झालेली वज्रमूठ सभा ही शेवटची सभा ठरणार असल्याची भाकिते अनेकांनी केली होती. त्यानुसार या सभांचे नियोजनही ठप्प झाले होते. पण कालच्याच बैठकीत या सभांचे सत्र पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही झाला आहे. विसकटू पाहाणारी महाविकास आघाडीची ही वज्रमूठ आता पुन्हा मजबूत झालेली दिसते आहे.