देशातील विमानांबाबत धमक्यांचा एक वेगळाच ट्रेंड सुरू आहे. गुरुवारीही इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा आणि आकासा या कंपन्यांच्या विमानांच्या संदर्भात धमक्या देण्यात आल्या. 85 विमानांमध्ये बॉम्ब ठेवले असल्याची माहिती होती. प्रत्येक कंपनीच्या साधारण 20 उड्डाणांना याचा फटका बसला. गेल्या आठवडाभरापासून हाच विकृत प्रकार सुरू आहे. सर्व धमक्या केवळ अफवा ठरल्या आहेत. त्याचा आपण आनंद मानायचा का? कोणताही घातपात झाला नाही ही हायसे वाटणारी बाब जरूर असली, तरी या धमक्यांमुळे एक बहुस्तरीय समस्या निर्माण होण्याचाही धोका आहे. विमानांपुरते मर्यादित न राहता त्याचे लोण अन्यत्रही पसरू शकते. विमानसेवा दररोज विस्कळीत होते आहे. त्यावर अद्याप ठोस उपाय हाती लागलेला नाही. फोनवर धमकी अथवा धमकीचा मेल आल्यावर काही काळ विमानतळांवर गोंधळ उडतो. सुरक्षा संस्थांची धावपळ होते, तेवढा काळ प्रवशांचा जीव टांगणीला लागतो. आपले प्राण धोक्यात आले असल्याची भीती किंवा धोक्यातून सुटका झाली यावर प्रवासी हेलकावे घेत राहतात. पण असल्या थिल्लर प्रकारांमुळे अनेकांचे वेळापत्रक कोलमडते. कोणी काही कमिटमेंट केल्या असतात, कोणाची तातडीची बैठक असते, कोणाला कुठेतरी वेळ गाठायची असते, कोणी विद्यार्थी, उद्योजक, कोणी महिला अन् तिच्यासोबत एखादे लहान मूल असते या सगळ्यांची तारांबळ उडते. त्यांचा जीव टांगणीला लागतो आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांना काहीच करता येत नाही. धमक्या देणार्यांना हेच अपेक्षित आहे का? विमानतळांवर सावधगिरी बाळगली जाते आहे. गुन्हेगारांना शिक्षा दिली जाईल असेही बोलले गेले. तरीही समस्येवर उपाय मात्र सापडलेला नाही. कॉल आणि मेल फसवे निघाले ही गोष्ट खरी आहे. मात्र त्यामुळे पुन्हा येणार्या असल्या कॉलकडे दुर्लक्ष करता येत नाही. तो आला की सगळ्या यंत्रणेला सतर्क व्हावेच लागते आणि कामालाही लागावे लागते. आजच्या डिजिटल युगात चोरटे, भुरटे अथवा असले धमक्यांचे उद्योग करणारी मंडळी स्मार्ट झाली आहेत हे नाकारून चालणार नाही. त्यांना मात देण्यासाठी पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणाही स्मार्ट झाल्या आहेत हेही तेवढेच सत्य आहे. मात्र एखाद्या धमकीचा उगम कुठून झाला आहे याचा छडा लावण्यापर्यंत बराच वेळ जातो. तोपर्यंत सुरक्षा संस्था एका अनिश्चितेत असतात आणि प्रवासी हवालदील असतात. धमक्यांच्या काही प्रकरणात आरोपींना पकडण्यात यश आले आहे. काहींना त्याची शिक्षा होते आहे. मात्र ठळक कारवाई काय करणार, तर संबंधितांचे नाव ‘नो फ्लाय’च्या यादीत टाकले जाण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. एवढी कारवाई पुरेशी आहे का? त्यामुळे विमान कंपन्या आणि प्रवाशांचे जे नुकसान झाले आहे ते भरून निघेल का? शिवाय असल्या प्रकारांमुळे जी भीती निर्माण झाली आहे किंवा होऊ पाहत आहे त्याचे काय? आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स, मेटा आणि एअरलाइन्स कंपन्यांसोबत या धमक्यांबाबत एक व्हर्चुअल बैठक घेतली. अशा धोकादायक अफवांचा प्रसार रोखण्यासाठी तुम्ही काय केले अशी विचारणा त्यांना केली होती व तुम्हीच असल्या गुन्ह्यांना प्रोत्साहन देत असल्याचा ठपकाही त्यांच्यावर सरकारने ठेवला. मंत्रालयाची ही भूमिका अयोग्य आहे असे म्हणता येणार नाही. त्याचे कारण ज्या माध्यमाने जग जवळ आणण्यासाठी एखादा प्लॅटफॉर्म तयार केला असेल, तर त्याचा वापर कोणी विकृतांचा समूहही करू शकतो याचीही त्यांना कल्पना असणार व त्यानुरूप त्यांनी काय काळजी घेऊन ठेवली आहे किंवा घेण्याची गरज आहे याची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्यावरही येते. निव्वळ दहा-बारा दिवसांत जर तिनशेच्या आसपास बॉम्बच्या धमक्या आल्या असतील आणि त्यात विमान सेवा पुरवणार्या कंपन्यांचे हजार कोटी रुपयांच्या घरात नुकसान झाले असेल आणि हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला असेल, तर आणखी एक निनावी कॉल अथवा मेल असे म्हणत सहजपणे त्याकडे दुर्लक्ष करून भागणारे नाही. धमक्यांचे हे एक सुनियोजित कारस्थान आहे का, त्यामागचे मनसुबे वेगळेच काही आहेत का? केवळ घातपात करणे हा इरादा आहे की घातपाताची भीती बसवून अर्थकारणालाच खिळ घालण्याचा हा डाव आहे, असे अनेक प्रश्न आहेत. रोज होणार्या या प्रकारांमुळे आणि त्याच्या संदर्भात येणार्या बातम्यांमुळे सगळ्यांत सुरक्षित मानल्या जाणार्या विमान प्रवासाबाबत एक अनिश्चित स्वरूपाचा मानसिक प्रभावही पडू शकतो. या प्रकाराचा एकदा सोक्षमोक्ष होणे आवश्यक आहे. पूर्वीचे लोक एका खोडकर मुलाची गोष्ट सांगायचे. ‘लांडगा आला रे आला’ अशी हाकाटी तो देत विनाकारण भीती निर्माण करायचा. कालांतराने ही खोड लक्षात आल्यावर त्याच्या हकाटीकडे दुर्लक्ष करण्याकडेच कल राहू लागला व अखेर खरेच लांडगा आल्यावर व्हायचे ते नुकसान झाले. तसेही या धमक्यांच्या बाबतीत होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. सुरक्षा संस्था अथवा गुप्त माहिती विभाग चालवणारी माणसेच असतात. त्यांना अनुभवाने काही गोष्टींचे ज्ञान असते मात्र अफवेचा उगम होतो कुठून हे शोधून काढण्यासाठी त्यांना विशेष इंद्रिय दिलेले नसते. त्याचा माग त्यांना समाजात वावरणार्या चौकस लोकांच्या निरीक्षणातून आणि त्यांनी पुरवलेल्या माहितीतूनच काढता येतो. त्यामुळे या संस्थांच्या मदतीसाठी सगळ्यांनीच चौकस राहण्याचीही आवश्यकता आहे.