उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवेल अशी घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा स्वबळाचे सूर आळवले गेले. विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभवानंतरच उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिले होते. आता संजय राऊत यांनी थेट अशा प्रकारची घोषणा केली असल्यामुळे लवकरच होणार्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विघटित स्वरूपात मतदारांना सामोरी जाईल असे दिसते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या या घोषणेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दिलेली प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
एकीकडे सत्ताधारी महायुती महापालिका निवडणूकसुद्धा एकत्रपणे लढवण्याचे नियोजन करत असताना महाविकास आघाडीमध्ये असे विघटन झाले, तर स्थानिक पातळीवरही सत्तांतर होण्याची भीती महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी लक्षात घ्यायला हवी. गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता मिळवण्यासाठी आणि कायम ठेवण्यासाठी भाजपने पूर्वी शिवसेनेला अनेक वेळा मदत केली आहे. काही वर्षांपूर्वीच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या असूनही महापौरपदाचा मान तेव्हा भाजपने शिवसेनेला दिला होता. आता शिवसेनेतील फुटीनंतर चित्र बदलले आहे आणि मुंबई महापालिकेतील नगरसेवकांमध्येही त्याच प्रकारे फूट विभागली गेली आहे.
काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत, तर काही नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. या परिस्थितीमध्ये जर पुन्हा एकदा सत्ता मिळवायची असेल तर खरे तर उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मदतीची गरज आहे. पण एकदा होऊनच जाऊ द्या, या भूमिकेतून शिवसेनेने आता स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. कोण किती पाण्यात आहे हे या निमित्ताने समजणार असले तरी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांना गमावण्यासारखे काहीच नाही. कारण या दोन पक्षांची आतापर्यंतच्या महापालिका निवडणुकीमधील कामगिरी दखलपात्र अशी नाही. पण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मात्र बरेच काही सिद्ध करायचे आहे.
मुंबई महापालिकेवर जर त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा झेंडा आणायचा असेल, तर त्यांना भाजपची आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मदत लागणारच आहे. ज्या प्रकारे गेल्या काही दिवसांमध्ये भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्याबरोबर संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे ते पाहता महायुतीमध्ये या निवडणुकीसाठी एखादा चौथा भिडूसुद्धा येऊ शकतो. याच परिस्थितीमध्ये दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई महापालिकेच्या क्षेत्रामध्ये जरी अजूनही उद्धव ठाकरे यांच्या नावाचा करिष्मा असला तरी विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील मतदार उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. अशाच प्रकारची स्थिती पुणे, नागपूर, नाशिक आणि ठाणे या इतर महापालिकांमध्ये असणार आहे. भाजपच्या शिर्डी येथे सुरू असलेल्या राज्य अधिवेशनामध्येसुद्धा आता एक युद्ध जिंकलं पुढच्या युद्धासाठी सराव चालू ठेवा अशा प्रकारची घोषणा करण्यात आली.
पुढील युद्ध म्हणजे महापालिका निवडणूक हेच असणार आहे. उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांची ताकद अजून कमजोर करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येसुद्धा त्यांना धक्का देणे गरजेचे आहे याची जाणीव भाजपच्या नेत्यांना आहे. मुंबई महापालिकेमध्ये जर ठाकरे यांची सत्ता गेली तर तो एकनाथ शिंदे यांच्यासाठी आणि भाजपसाठीसुद्धा महत्त्वाचा विजय ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीतील चांगल्या विजयानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार फटका बसल्यानंतर खरे तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी महापालिका निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करून दाखवणे हाच एक उद्देश असू शकतो.
पण स्वबळाचा नारा देत असताना या उद्देशाकडे दुर्लक्ष होत आहे की काय याचा विचार त्यांना करावा लागणार आहे. शिवनेतील फुटीनंतर मतदारांची विभागणी झाली आहे आणि त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला झाला. महापालिकेसारख्या निवडणुकीमध्येसुद्धा मतदारांची विभागणी कोणत्या गटाच्या बाजूने जास्त जाते त्यावर यश अवलंबून राहणार आहे. एकत्रित महायुतीच्या समोर जर महाविकास आघाडीचे विविध घटक पक्ष स्वतंत्रपणे उभे ठाकले तर त्याचा फायदा महायुतीलाच होणार आहे हे गृहीत आहे. पण एकदा आपली स्वबळाची ताकद अजमावून बघण्यासाठीच बहुदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने हा नारा दिला आहे.
एकीकडे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पाठिंबा न देता उद्धव ठाकरे यांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा देऊन इंडिया आघाडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलेच आहे आणि आता महाराष्ट्राच्या पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा देऊन त्यांनी महाविकास आघाडीच्या अस्तित्वाबाबतही प्रश्नचिन्ह समोर आणले आहे. एखाद्या निवडणुकीतील विजयानंतर विजयी आघाडी जास्त मजबूत होते पण निवडणुकीतील पराभवानंतर मात्र अशी एखादी आघाडी विघटित होऊ लागते याचाच हा पुरावा आहे. महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. जेव्हा निवडणुका जाहीर होतील त्या कालावधीमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकते.