विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. निदान आज शेवटच्या दिवशी तरी सकाळपर्यंत महायुती आणि महाआघाडी यांच्यातील जागावाटपाचा घोळ संपेल असे वाटत होते; पण अक्षरशः उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यासाठी केवळ काही मिनिटे शिल्लक असेपर्यंत हा घोळ संपलेला नव्हता. उमेदवारी अर्ज भरण्याला एक तास शिल्लक असताना जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार महायुतीतील चार जागांचा आणि महाविकास आघाडीतील 12 जागांचा निर्णय होऊ शकलेला नव्हता. नेहमीच्या निवडणुकीत जो घोळ दिसतो तो दोन्ही युती आणि आघाड्यांमध्ये याही वेळी दिसला. अनेक ठिकाणी मित्र पक्षांनीच आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म देऊन हा गोंधळ वाढवून ठेवला आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत तडजोड होऊ न शकलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये दोन्ही ठिकाणाहून आता मैत्रीपूर्ण लढतीही पाहायला मिळणार आहेत. ‘मैत्रीपूर्ण लढत’ हा शब्दप्रयोग विनोदी आहे. आपसात राजकीय एकमत नसल्याचे हे निदर्शक आहे. पक्षातील उमेदवारांवर आणि कार्यकर्त्यांवर प्रदेश पातळीवरून नियंत्रण नसणे आणि कोणाचा कोणाला पायपोस नसणे याचेच हे लक्षण मानावे लागेल. जशी लोकसभा निवडणूक झाली तशी विधानसभेची तयारी दोन्ही बाजूंकडून सुरू झाली. निवडणुकीसंदर्भात प्राथमिक चर्चेच्या फेर्याही झाल्या. या प्रक्रियेला चार-पाच महिने होऊन गेले तरी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत या पक्षांचे उमेदवारीबाबत एकमत होत नसेल तर हे लोक नेमकी चर्चा कसली करत होते, असा प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहिला नसेल. महाराष्ट्रात राजकीय स्थितीचे वर्णन पूर्ण अनागोंदीची स्थिती असलेले राज्य अशीच करावी लागेल. प्रत्येक पक्ष आपल्याला अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असणार हे जरी खरे असले तरी, आज प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिमा, आपापल्या पक्षांची राजकीय ताकद आणि मतदारसंघात केला गेलेला निवडणूकपूर्व सर्व्हे अशा सगळ्या गोष्टी हाताशी असताना कुठल्याही राजकीय पक्षाला ठामपणे आपली उमेदवारी यादी निवडता आलेली नाही हे स्पष्ट दिसून आले आहे. पूर्वी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस विरुद्ध विरोधी पक्ष असा सरळ सामना असायचा. काँग्रेस एकसंध होती आणि विरोधी पक्ष मर्यादित राजकीय क्षमतेचे होते. अशावेळी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी युती किंवा त्याच्याही आधी पुलोद, तिसरी आघाडी, चौथी आघाडी किंवा आणखीन कसली तरी आघाडी, असल्या आघाड्या उभारून काँग्रेसला आव्हान दिले जायचे. पण त्या वेळेचा मामला साधा सरळ होता. तथापि, यंदा महाराष्ट्रात मात्र सारखेच नामसाधर्म्य असलेले चार पक्ष दोन वेगवेगळ्या आघाड्यातून उभे आहेत. शिवसेनेचे दोन पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष आणि त्यांना काँग्रेस आणि भाजपच्या नेतृत्वाची साथ असा राजकीय संघर्ष राज्यात बघायला मिळतो. बाकीच्या छोट्या पक्षांची वाटणीही महाविकास आघाडी आणि महायुती यांनी आपसात करून घेतली. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांवरच भ्रमिष्ट होण्याची वेळ आलेली आहे. कोण निष्ठावान, कोण कार्यक्षम, कोण प्रामाणिक, कोण कर्तव्यदक्ष असे निकष लावायला मतदारांना आता संधी उरलेली नाही. सकाळपर्यंत एका पक्षात असलेला माणूस प्रत्यक्ष अर्ज भरताना दुसर्या पक्षात गेलेला अनेक ठिकाणी पाहायला मिळाला. त्यातून एक गोष्ट निश्चित झाली की विधानसभेत प्रतिनिधित्व करू इच्छिणारे हे सगळेच महाभाग जनहितासाठी उभे नसतात, तर केवळ स्वतःची राजकीय दुकानदारी लक्षात ठेवूनच सार्वजनिक जीवनामध्ये कार्यरत राहिलेले दिसतात. राजकारण हे आता गुंडगिरी, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीचे अधिकृत लायसन्स मिळवण्याचे क्षेत्र झाले आहे असा समाज आज दृढ झाला आहे. वर नमूद केल्याप्रमाणे ही निवडणूक आता मतदारांची खर्या अर्थाने कसोटी आहे. कारण मतदारांनी त्यांना नेमके काय हवे असते हे मतदानातून स्पष्ट करण्याची गरज आहे आणि तसा स्पष्ट संदेश जोपर्यंत मतदार राजकीय उमेदवारांना देत नाहीत तोपर्यंत राजकीय पक्षांमध्ये अशा उठवळ लोकांचीच चलती चालू राहणार आहे. खरं म्हणजे राजकीय पक्षांच्या अजेंड्यापेक्षा आता महाराष्ट्रातल्या मतदारांनी आपला नेमका अजेंडा ठरवला पाहिजे. स्थानिक पातळीवरच्या नागरिकांना कोण किती लायकीचा आहे आणि कोणाचे दोन नंबरचे धंदे आहेत, कोण गुंड प्रवृत्तीचा आहे किंवा कोण गँग जमवून दहशत वाजवणार्या प्रवृत्तीचा आहे हे लोकांना सहज लक्षात येत असते. अशा सगळ्याच उमेदवारांना नेम धरून जोपर्यंत मतदारांकडून पराभूत केले जात नाही तोपर्यंत राजकारणातील ही भंपक विकृती चालूच राहणार आहे. महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा तसेच संत आणि शूर पराक्रमी राजांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथे सावर्जनिक जीवनातील सभ्यतेला आणि सुसंस्कृतपणाला कमालीचे महत्त्व दिले जाते. म्हणूनच महाराष्ट्राचे नाव संपूर्ण देशात जागरूक मतदारांचे राज्य म्हणून प्रस्थापित झाले आहे. परंतु या नावाला काळिमा फासण्याचे उद्योगही याच निवडणुकीच्या काळात पाहायला मिळाले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांच्या घरातील लोकांवर आणि महिलांवर ज्या भाषेत जाहीर व्यासपीठावर विकृत स्वरूपाची भाषा वापरून टीका केली गेली, ती पाहता मतदारांचीच जबाबदारी खूप वाढली आहे. एक राजकीय फंडा म्हणून धर्माचा झेंडा आक्रमकपणे उचलून धरण्याचा प्रकार एक वेळ समजू शकतो, पण त्यासाठी दुसर्या धर्मावर, विद्वेष निर्माण होईल अशा भाषेचा वापर करून टीका करणे आणि समाजातील सलोख्याचे वातावरण बिघडून टाकणे हा खेळ मात्र राजकारण्यांनी थांबवायला हवा. तुमची निवडणूक महिना-पंधरा दिवसांत संपेल, पण त्यातून समाजमनावर जे ओरखडे उमटले जातील ते भरून निघायला किती कालावधी लागेल याचा अंदाज बांधता येत नाही. समाजामध्ये निर्माण होणारी कटुता आणि वैमनस्य कमी करणे ही राजकारणातील धुरिणांची जबाबदारी असते, पण हे लोकच बेजबाबदारीचे दर्शन घडवत असतील तर ते अधिक वेदनादायी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदारांनी ठाम निर्धाराने काही भूमिका घेणे आता गरजेचे आहे. किमान जो उमेदवार सार्वजनिक जीवनातील सभ्यतेची मर्यादा बाळगतो, जो स्वतः गुंडगिरी करत नाही आणि कुठल्याही गुंड आणि भ्रष्ट प्रवृत्तीला पाठीशी घालत नाही अशाच उमेदवारांच्या पाठीशी आम्ही उभे राहू, असा निर्धार करून मतदारांनी मतपेटीतून तसा संदेश देणे आता काळाची गरज बनली आहे.