आधुनिक काळामध्ये केवळ प्रौढ व्यक्तींनाच विविध प्रकारच्या ताणतणावांना सामोरे जावे लागते असे नाही, तर शालेय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनाही ताणतणावाचा सामना करावा लागतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका नवीन अहवालानुसार, जगातील सर्वच देशांमधील शाळांमध्ये किशोरवयीन मुलांवर अभ्यासाचा दबाव वाढत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अहवालातील निष्कर्षाप्रमाणे या विद्यार्थ्यांना शालेय पातळीवर मित्र आणि कुटुंब यांच्याकडून मिळणारा पाठिंबाही लक्षणीयदृष्ट्या कमी होत आहे. एकीकडे कोणत्याही देशाचा विकास मोजण्यासाठी विविध प्रकारची परिमाणे जरी उपलब्ध असली आणि मोठ मोठ्या इमारती आणि उंच उंच पूल किंवा विमानतळ यांना समोर ठेवून जरी विकास झाला असे दाखवण्यात येत असले तरी आगामी मनुष्यबळ म्हणून ज्यांचा विचार करावा लागणार आहे त्या शालेय विद्यार्थ्यांच्या या तणावग्रस्त परिस्थितीकडे कोण लक्ष देणार, हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. शालेय पातळीवर विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा दबाव वाढल्यामुळे केवळ त्यांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे असे नाही, तर शारीरिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. आधुनिक काळामध्ये कोणत्याही कुटुंबामध्ये आपल्या घरातील मुले हा जरी प्राधान्याचा विषय असला आणि सर्व सुख सोयी त्या मुलाला उपलब्ध करून देण्याकडे पालकांचा जरी कल असला, तरी या मुलाला नक्की काय पाहिजे आहे याची कल्पना जर पालकांना नसेल, तर काय होऊ शकते हेच या अभ्यासावरून समोर आले आहे. गेल्या काही कालावधीमध्ये शालेय पातळीवर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना कुटुंबाकडून विशेषतः त्यांच्या पालकांकडून मिळणारा पाठिंबा कमी होत असल्याचे लक्षात आले आहे. केवळ आपल्या पाल्याला भौतिक गोष्टींचा पुरवठा करून किंवा अतिशय चांगल्या आणि सर्वात महागड्या शाळेमध्ये प्रवेश दिला की आपले कर्तव्य संपले असे जर आधुनिक काळातील पालकांना वाटत असेल, तर हा अहवाल त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरणार आहे. विद्यार्थ्याला सर्व भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या की आपली जबाबदारी संपली असे जर आता पालकांना वाटत असेल तर ते चुकीचे ठरणार आहे. या अहवालातील दुसरी गोष्ट म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना मित्रांचा पाठिंबाही कमी होत चालला आहे. म्हणजेच एकीकडे घरात पालकांकडून होणारे दुर्लक्ष आणि कमी प्रमाणात मिळणारा पाठिंबा आणि दुसरीकडे बाहेरच्या जगामध्ये मित्रांचा कमी होणारा सहवास अशा दुहेरी चक्रात आधुनिक विद्यार्थी अडकला आहे. साहजिकच त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असेल तर आश्चर्य नाही. युरोपियन किंवा अमेरिकन देशांमधीलच ही परिस्थिती आहे असे नाही, तर भारतामध्येसुद्धा अशीच परिस्थिती असल्याचा उल्लेख हा सर्वात महत्त्वाचा आहे. आयुष्यात ज्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता तयार होत असते आणि आपण भविष्यामध्ये काय करणार आहोत याबाबत त्याचे एक चित्र मनात तयार होत असते त्याच कालावधीमध्ये त्याला घरातून कुटुंबाचा पुरेसा पाठिंबा मिळत नसेल किंवा बाहेरच्या जगात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यामध्ये अडचणी येत असतील, तर त्याचा थेट परिणाम त्याच्या भविष्यावर होणे साहजिकच आहे. एकीकडे आधुनिक जगात निर्माण झालेल्या भयंकर स्पर्धेमध्ये टिकण्याचे आव्हान पेलत असतानाच प्रत्येक परीक्षेमध्ये चांगले यश मिळवण्याचे काम विद्यार्थ्यांना करावे लागत आहे. विद्यार्थी ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असतात त्या शिक्षण संस्थांकडूनही या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर दबाव असतो. कारण या शिक्षण संस्थांनासुद्धा निकालाच्या माध्यमातूनच आपल्या संस्थेची जाहिरात करता येते. दुसरीकडे पालकांचासुद्धा या विद्यार्थ्यांवर दबाव असतो. या सर्व एकत्रित दबावाचा परिणाम म्हणून अनेक वेळा विद्यार्थी केवळ एक कर्मकांड म्हणून दिवस-रात्र अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये झोकून देतात. आपण जे वाचत आहोत किंवा ज्याचा अभ्यास करत आहोत ते आपल्याला कितपत कळत आहे याचा विचारही आता केला जात नाही. विद्यार्थी परीक्षार्थी झाल्यामुळेच परीक्षेत चांगले यश मिळाले की पालक आणि शिक्षक यांना खूश करण्याकडेच अनेक विद्यार्थ्यांचा कल राहतो. शिक्षक आणि पालक यांच्या दबावामुळेच त्या विद्यार्थ्याला स्वतःला जे काही करायचे असते त्याकडे दुर्लक्ष होते आणि वेगळाच तणाव निर्माण होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या या ताज्या अहवालात या विविध बाबींवर प्रकाश टाकल्यानंतर आता भारतासह विविध देश जर जागे झाले नाहीत, तर आगामी काळातील हे मनुष्यबळ असे तणावग्रस्त राहण्याचा धोका वाढत जाणार आहे. सुदैवाने भारताने गेल्या काही वर्षांपूर्वी जे नवे शैक्षणिक धोरण आणले आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांवरील हा शैक्षणिक दबाव कमी करण्याबाबत काही उपाययोजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. विद्यार्थ्याला त्याच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याचे पर्यायही नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आहेत. अद्याप भारतामध्ये हे नवे शैक्षणिक धोरण संपूर्णपणे अमलात आलेले नाही. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालामुळे या शैक्षणिक धोरणाची उपयुक्तता नव्याने सिद्ध होत आहे. अर्थात, अशा प्रकारच्या धोरणाची अंमलबजावणी करणे हे सरकारचे काम असले, तरी कौटुंबिक पातळीवर पालकांनासुद्धा जबाबदारी ओळखावी लागणार आहे. एलकेजी आणि यूकेजीमध्ये जाणार्या तीन वर्षांच्या मुलावरही ज्या प्रकारचा दबाव सध्या पालक टाकत आहेत ते योग्य नाही हे आता समजून घेण्याची गरज आहे. मुलांना शालेय अभ्यास हे ओझे न वाटता ती एक सहज प्रक्रिया वाटली पाहिजे हा विचार जर शिक्षण संस्था आणि पालक यांनी केला तरच विद्यार्थ्यांवरील हे अभ्यासाचे ओझे कमी होऊ शकते आणि विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा होईल.