उत्सवप्रिय भारताची ओळख खर्या अर्थाने जगाला करून देणारा जो दीपावलीचा सण आहे त्या प्रकाशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत असल्याने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. केवळ भारतच नाही तर जगाच्या कानाकोपर्यामध्ये जेथे भारतीय वंशाच्या नागरिकांनी आपली मुळे रुजवली आहेत त्या ठिकाणीही या प्रकाशोत्सवाच्या निमित्ताने नकारात्मकतेचा अंधार संपुष्टात येणार आहे. वर्षभर सतत कोणता ना कोणता उत्सव साजरा करण्याची मानसिकता असणार्या तमाम भारतीयांकडून दीपावलीच्या सणाला राजाचा दर्जा दिला जातो. सामाजिक भेदाभेदाचा विचार करता राजा असो अथवा रंक असो प्रत्येक जण आपापल्या परीने आणि आपापल्या क्षमतेप्रमाणे या सणाचे स्वागत करत असतो. त्यामुळेच भारतासारख्या बहुसंस्कृती, बहुभाषीय, बहुजातीय, बहुधर्मीय देशामध्ये दीपावलीच्या कालावधीमध्ये एखाद्या झोपडीच्या बाहेरही आकाशकंदील दिसतो आणि अब्जावधीची उलाढाल करणार्या उद्योगपतीच्या बंगल्याबाहेरही आकाशकंदील दिवाळीचे स्वागत करत असतो. दीपोत्सवाच्या या काही दिवसांच्या निमित्ताने का होईना सामाजिक भेद काही प्रमाणात कमी होतात आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. दीपावलीमधील जे विविध उपप्रकार आहेत ते एक प्रकारे भारताची कुटुंब व्यवस्था मजबूत करण्याचे काम करत असतात. म्हणूनच पूर्ण कुटुंब एकत्रपणे अशा प्रकारचे सण साजरे करत असतात. पती आणि पत्नी यांच्या प्रेमाची वीण घट्ट करणारा ‘दिवाळी पाडवा’ हा सण असो किंवा भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा ‘भाऊबीज’ हा सण असो किंवा भौतिक सुखसमृद्धीची आस बाळगणार्यांसाठी लक्ष्मीची आराधना करणारा ‘लक्ष्मीपूजना’सारखा सण असो या सर्व सणांमध्येच कुटुंब हा घटक समान असल्यामुळे या सणाच्या निमित्ताने कुटुंब व्यवस्था मजबूत करण्याचे काम केले जाते. वर्षांनुवर्षे प्रकाशोत्सवाचा हा सण अशाच प्रकारे साजरा केला जात आहे. जरी गेल्या काही वर्षांमध्ये या सणाला आधुनिकतेचा साज चढला असला तरी परंपरा कायम ठेवूनच हा सण साजरा करण्याकडे तमाम भारतीयांचा कल आहे. अर्थात, सणाच्या निमित्ताने जो पर्यावरणाचा विषय समोर येतो तो मात्र सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात त्यामुळे ध्वनिप्रदूषण आणि हवा प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे आकडे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध होत आहेत. मोठ्या आवाजाचे फटाके वाजवण्यावर न्यायालयीन बंधने आहेत. पण या बंधनांचे पालन करण्याची मानसिकता अनेक वेळा सर्वसामान्य नागरिकांकडे नसते. त्यामुळे दरवर्षी अक्षरशः कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांचा धूर केला जातो. काही प्रमाणात याला आळा बसला असला तरी आणि आवाजांच्या फटाक्यापेक्षाही रोषणाईचे फटाके वापरण्याकडे कल दिसत असला तरी या कालावधीमध्ये ध्वनी आणि हवा प्रदूषणाने अत्युच्च पातळी गाठलेली असते. दीपावलीचा उत्सव आणि फटाक्याचे नाते असल्यामुळे त्यातून संपूर्णपणे बाहेर येण्याची अद्याप सामाजिक मानसिकता तयार झालेली नाही हेच खरे. भारतासारख्या संस्कृतीप्रिय देशामध्ये कोणत्याही आनंदी गोष्टीनंतर फटाके वाजवूनच स्वागत करण्याची परंपरा आहे. त्यामुळे निवडणुकीतील विजय असो किंवा इतर कोणत्या गोष्टींमध्ये मिळालेले यश असो फटाके वाजवल्याशिवाय ते यश साजरे केले जाते असे वाटत नाही. त्याच मानसिकतेतून भारतीय दीपोत्सवाला फटाक्यांची अपरिहार्य झालर मिळाली आहे. उत्सवाच्या या काही दिवसांच्या कालावधीमध्ये बाजारपेठेमध्ये अक्षरशः अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. अर्थव्यवस्थेला चालना मिळते. छोट्या व्यावसायिकांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांनाच आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याने मोठ्या प्रमाणावर रोजगारही निर्माण होतो. भारतातील कोणताही मोठा उत्सव हा एक अर्थव्यवस्थेच्या विकासाचा भाग म्हणूनच पाहिला जातो. दिवाळीत जेवढी उलाढाल होते तेवढी उलाढाल इतर कोणत्याही उत्सवात होत नाही हेसुद्धा एक आर्थिक सत्य आहे. दिवाळीतील मुहुर्तावर लक्ष ठेवूनच मोठमोठ्या खरेदी केल्या जातात. मोठमोठ्या गृह प्रकल्पांची पायाभरणी केली जाते, सोने आणि इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी विक्रीही केली जाते. एक प्रकारे अर्थव्यवस्थेलासुद्धा प्रकाश देण्याचे काम हा दीपोत्सव करत असतो. यावर्षी तर दीर्घकाळानंतर दीपावली उत्सव चार दिवसांसाठी साजरा केला जाणार आहे. साहजिकच तमाम भारतीयांच्या उत्साहाला निश्चितच उधाण आले आहे. महाराष्ट्र आणि झारखंडसारख्या राज्यामध्ये यावर्षी दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा उत्सवही रंगला असल्यामुळे यावर्षीच्या प्रकाशोत्सवाला एक राजकीय झालरही आहे. आणखी चार आठवड्यांनंतर जेव्हा या निवडणुकीचे निकाल जाहीर होतील तेव्हा दिवाळीपेक्षा मोठ्या प्रमाणात फटाके फुटतील अशी लक्षणेही आताच दिसू लागली आहेत. या दीपोत्सवाच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचण्याचे कामही विविध राजकीय पक्ष करू लागले आहेत. लहानांपासून थोरापर्यंत सर्वांच्या आनंदाचे कारण ठरणारा दीपोत्सव हा सर्वसामान्यांच्या चेहर्यावर आनंदाचे प्रतिबिंब परावर्तित करीत असतो. आपल्या दैनंदिन आयुष्यातील विविध समस्यांचा क्षणभर विसर पडून सर्वजण आनंदाने या सणाला सामोरे जात असतात. समाजात एका प्रकारचे सकारात्मक वातावरण तयार करण्याचे काम असे उत्सव करत असतात. या दीपोत्सवाच्या निमित्ताने तमाम भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण होवोत आणि आगामी कालावधी सुखसमृद्धी आणणारा आणि आरोग्यदायी ठरावा अशा शुभेच्छा.