‘लवकरच होणार्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला विजयासाठी दहा टक्के मते अधिक हवी आहेत. ती मते मिळवण्याचा प्रयत्न आगामी कालावधीमध्ये कार्यकर्त्यांनी करावा,’ असा संदेश भाजपाचे ज्येष्ठ नेते, रणनीतिकार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागपूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना दिला. अर्थात, अमित शहा यांच्या या संदेशांमध्ये फक्त ‘दहा टक्के मते’ असा शब्दप्रयोग असला तरी लोकशाही राजकारणातील निवडणुकीचा विचार करता दहा टक्के या मतदानाच्या आकड्याच्या मागे फक्त हे विशेषण लावून चालत नाही. कारण 10 टक्के ही भरपूरच मते असतात. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्र पक्षांना मोठ्या प्रमाणावर श्रम घ्यावे लागणार आहेत. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांचा विचार करता दोन ते तीन टक्के मतांचा जरी बदल झाला तरी सत्तांतर होऊ शकते, असे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दहा टक्के अधिक मते मिळवण्याचा संदेश दिला आहे. त्यासाठी त्या प्रमाणातच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. ‘लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या असल्या, तरी काळजी करण्याचे कारण नाही. राज्यातही आपले सरकार येईल’, अशा प्रकारचा विश्वास कार्यकर्त्यांना देताना अमित शहा यांनी ‘महायुतीतील प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करा’ हा संदेश दिला हे जास्त महत्त्वाचे आहे. तसेच काँग्रेसला पराभूत करणे हेच लक्ष्य ठेवताना दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही रोखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेली अनेक वर्षे भाजपाचा बालेकिल्ला असलेला विदर्भ राखण्याचे काम भाजपाला करावेच लागणार आहे. विदर्भात किमान 45 जागा जर भाजपने जिंकल्या तर राज्यात सत्तेवर येणे सोपे जाईल, असेही त्यांनी सुचित केले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये पूर्वीपासूनच अमित शहा निवडणूक मॅनेजमेंटसाठी प्रसिद्ध आहेत. बूथ लेव्हलपासून मतदारांचे नियोजन करून त्याचे मतदानामध्ये परिवर्तन करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. याच कौशल्याचा पुन्हा एकदा वापर करून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीला सत्तेवर आणण्याचा त्यांचा निश्चय दिसतो. खरे तर अमित शहा यांनी हा संदेश देण्यापूर्वीच भाजपच्या नेत्यांनी बूथ टू बूथ नियोजन सुरू केले असून मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये मतांचे मोठ्या प्रमाणावर धार्मिक ध्रुवीकरण झाल्याने आणि भाजपला मानणारा मतदार मतदानासाठी बाहेरच न पडल्याने त्याचा मोठा फटका बसल्याचे समोर असल्याने भाजपच्या पारंपरिक मतदाराला कोणत्याही परिस्थितीत मतदानासाठी बाहेर काढण्याचे हे नियोजन आहे. भाजपबरोबर महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनाही बरोबर घेऊन जाण्याच्या सूचना अमित शहा यांनी केल्या. त्यामुळे या दोन्ही पक्षांचा जो मतदार आहे त्यांचीही संख्या वाढवण्याचे काम होणार आहे. राज्यात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी जर 10 टक्के अधिक मते मिळवायची असतील तर त्यासाठी भाजप, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट या सर्वांच्या एकत्रित मतांचीच बेरीज होण्याची गरज आहे, असेही एक प्रकारे अमित शहा यांनी कबूल केले आहे. कारण नाही म्हटले तरी भारतीय जनता पक्षाच्या पारंपरिक मतदारांच्या संख्येवर मर्यादा आहेत. जे पारंपरिक मतदार आहेत आणि मतदानासाठी बाहेर पडत नाहीत त्यांनाच बाहेर काढण्याचे काम यावेळी करावे लागणार आहे. त्याच्या जोडीनेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मदतीने मतांचा पाया वाढवण्याचेही आव्हान पेलावे लागणार आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ पक्षातून फुटून बाहेर असल्यामुळे आपोआपच त्यांच्या मतदारांमध्ये विभाजन झाले आहे. पण त्या त्या निवडणुकीला कोणते मतदार कोणत्या गटाची बाजू घेतील हे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. साहजिकच या दोन नेत्यांनासुद्धा आपल्याला मानणार्या आणि मत देणार्या मतदारांची संख्या वाढवावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये केवळ गाफील राहिल्याने आणि नेहमीच्या क्षमतेने मतदारांपर्यंत न पोहोचल्याने भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी झाल्या असल्याने आता अमित शहा यांनी या दिलेल्या संदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करणेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात आहे. हे काम इतके सोपे नाही याची जाणीव महायुतीतील सर्वच घटक पक्षांना जरी असली, तरी सध्या सत्ता हातात असल्यामुळे मतदारांना आकर्षित करणारे विविध प्रकारचे निर्णय गेल्या काही कालावधीमध्ये घेतले जात आहेत आणि आगामी कालावधीमध्येही घेतले जातील. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांच्या मतांचा पाया मजबूत करण्याचा एक प्रयत्न झालेला दिसतोच आहे. असे अनेक प्रयत्न झालेच तर अमित शहा यांना अपेक्षित असलेली मतदानामधील दहा टक्के वाढ प्रत्यक्षात येऊ शकेल आणि पुन्हा एकदा सत्ता मिळू शकते.