दिल्लीतील मराठी साहित्य संमेलन कोणत्याही मोठ्या वादाविना समाप्त होण्याच्या अवस्थेत असतानाच, समारोपाच्या टप्प्यात एका वेगळ्याच मुद्द्याने प्रचंड मोठे वादंग माजले. विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोर्हे यांनी तेथील एका परिसंवादात बोलताना या वादंगाला जन्म दिला. त्यांच्या म्हणण्याचा थेट मतितार्थ असा होता की, ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रमुखांना मर्सिडीज गाडी दिल्याशिवाय कोणालाही मोठे पद मिळत नाही. दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की एक मोठे पद तेथे मिळते, असे नीलम ताई म्हणाल्या आहेत. आता हे त्यांचे विधान खरे की खोटे हा वेगळा मुद्दा असेल, पण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आपण अशी व्यक्तिगत राजकीय हिशेबाची वक्तव्य करावीत का, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांनी हे वक्तव्य अयोग्य व्यासपीठावर करून निश्चितच चूक केली आहे. या व्यासपीठावर अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही स्थान दिले गेले होते, पण तेथे त्यांच्यापैकी कोणी फार वादग्रस्त राजकीय वक्तव्य करून आपला राजकीय हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न केला नव्हता, पण ती आगळीक मात्र नीलमताईंनी केली. दिल्लीतील या मराठी साहित्य संमेलनाचे महत्त्व फार मोठे होते, देशाच्या राजधानीत मराठी भाषेची पताका उंचावून धरण्याचे काम या संमेलनाने केले, तेथे अशा राजकीय मानसिकतेतून कोणीही कसलीही वक्तव्य करणे अपेक्षित नव्हते. परंतु तरीही नीलमताईंनी ही आगळीक केल्यानंतर त्यांना ठाकरे सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अतिशय आक्रमक प्रत्युत्तर दिले असून, नीलमताईंचा त्यांनी खरपूस समाचारच घेतला. काही वेळा नीलमताई यांचा एकेरी उल्लेख करत, ही विकृत मानसिकतेची बाई आहे अशी टिप्पणीही संजय राऊत यांनी केली. त्यावर पत्रकारांनी तुमच्या विरोधात हक्कभंग येऊ शकतो असे विधान करताच राऊत यांनी त्या पत्रकारालाही उडवून लावले. नुसते हक्कभंग नव्हे तर आम्ही ईडी सीबीआय आणि त्यांच्याकडून झालेली अटकही सोसून बाहेर पडलो आहोत, त्यामुळे असल्या हक्कभंगाला आपण किंमत देत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला राग व्यक्त केला. संजय राऊत केवळ नीलमताईंवरच तोंडसुख घेऊन थांबले नाहीत, तर त्यांनी साहित्य महामंडळाच्या प्रमुख उषा तांबे यांनाही चांगलेच फैलावर घेतले. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा असा राजकीय गैरवापर होऊ दिल्याबद्दल उषा तांबे यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार यांनीही नीलमताईंच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली. जेव्हा पवारांचा कोणी अपमान करतो त्यावेळी आम्ही त्यांच्या बाजूने बोलतो, मग आता पवारांनीही आमची बाजू उचलून धरत नीलमताईंच्या वक्तव्याचा निषेध करावा अशी मागणी राऊत यांनी केली. प्रतिक्रियेतून राऊत यांनी या वादाला व्यापक स्वरूप दिले आहे. उषा तांबे, शरद पवार आणि संयोजकांनाही त्यांनी या वादात ओढले आहे. दिल्लीतल्या संमेलनात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यासपीठावर संधी दिली गेली मग ठाकरे गटाच्या नेत्यांना का डावलले हा आक्षेपही त्यांनी तेथे नोंदवला. त्यामुळे नीलमताई यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आता इतक्यात थांबेल अशी शक्यता नाही. मुळात साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांना संधी द्यावी का, हा महाराष्ट्रात खूप वर्षांपासून चघळला गेलेला विषय आहे. त्यावर सर्व ज्येष्ठ साहित्यिक आणि सर्व दिग्गज नेत्यांनी यापूर्वीच आपापली मते व्यक्त केली आहेत. पण नीलम गोर्हे यांच्यासारख्यांचे कालचे वक्तव्य ऐकल्यानंतर संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांना स्थान देऊच नका असे निक्षून सांगण्याची वेळ आली आहे, एवढे मात्र नक्की. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर खुद्द नीलमताईंनी थोडी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. माझे वक्तव्य स्वानुभवावर आधारित आहे, बोलण्याच्या ओघात मी ते केले, असे सांगून त्यांनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही त्यांनी ‘स्वानुभव’ असा शब्द वापरल्याने हा वाद इतक्यात संपण्याची शक्यता नाही. कारण शिवसेनेत पक्षप्रमुखांना मर्सिडीज दिल्यावरच पदे मिळतात या विधानाच्या पुष्टर्थ स्वानुभव असा शब्दप्रयोग वापरून नीलमताईंनी आपला दावा अधोरेखितच करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर राऊत यांचे म्हणणे असे की, नीलमताईंना शिवसेनेने चार वेळा विधानपरिषद दिली मग नीलम गोर्हे यांच्या वक्तव्यानुसार त्यांनी चार दुणे आठ मर्सिडीज गाड्या शिवसेनेच्या नेत्यांना दिल्या असल्या पाहिजेत, कुठे आहेत त्या गाड्यांच्या पावत्या असा आव्हानात्मक सवालही राऊत यांनी केला. ज्या परिसंवादात नीलमताईंनी हे वक्तव्य केले, त्या परिसंवादाचे नाव ‘असे घडलो आम्ही’ असे होते. म्हणजे नेत्यांची हुजुरी करूनच महाराष्ट्रात राजकीय नेतृत्व घडत असते असे अधोरेखित करण्याचा प्रयत्न नीलमताई यांनी केला आहे, असा निष्कर्ष यातून काढला जाईल. दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अशा स्वरूपाची वक्तव्य महाराष्ट्राला कमीपणा आणणारी आहेत, नीलमताईंनी हे लक्षात घ्यायला हवे होते.