काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी तेथील ब्राउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादाचा व्हिडिओ नुकताच सदर विद्यापीठातर्फे प्रसारित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने 1984 साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर जी शीख विरोधी दंगल देशात उसळली होती त्या अनुषंगाने राहुल गांधी यांना प्रश्न केला. त्याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, ‘ज्यावेळी मी काँग्रेसमध्ये सक्रिय नव्हतो त्यावेळी काँग्रेसकडून ज्या चुका झाल्या त्या चुकांची मी जबाबदारी स्वीकारतो. शीख धर्माच्या विरोधात किंवा कोणत्याच धर्माच्या विरोधात अशी हिंसक निदर्शने व्हायला नको होती’, अशी प्रांजळ कबुली राहुल गांधी यांनी दिली आहे. यात खरे पाहता आक्षेप घेण्यासारखे काही नाही. ज्या घटना आपण पक्षात सक्रिय नसताना झाल्या आहेत, याची आपण जबाबदारी स्वीकारत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रांजळ कबुलीबद्दल त्यांना दादच द्यायला हवी आहे. पण हा विषय तेवढ्यावर थांबलेला नाही. राहुल गांधी यांच्या कुठल्याही विधानावर लगेच आक्षेप घेऊन गदारोळ उठवायची एक प्रथा सध्या देशात सुरू आहे आणि तीच यावेळीही पुन्हा दिसली. भाजपकडून त्यांच्या विधानावर पुन्हा आक्षेप घेतला गेला. वास्तविक शीखविरोधी दंगलीबद्दल काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने खूप पूर्वीच क्षमायाचना केली आहे. शीख धर्म आणि काँग्रेस पक्ष यांचे नातेही नंतरच्या काळात सुधारलेले पाहायला मिळाले. एवढेच नव्हे तर शीखबहुल पंजाब प्रांतात काँग्रेसला 1984 नंतर अनेक वेळा सत्ताही मिळाली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या विधानात शीखविरोधी दंगलीचे दुरान्वयानेही समर्थन केलेले दिसले नाही. याच कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भाषणाच्या ओघात असे वक्तव्य केले की, ‘भारत ज्याला महान मानतो ते सर्वच आणि अगदी भगवान श्रीराम यांच्यासारखे पौराणिक व्यक्तिमत्त्वही क्षमाशील, दयाळू होते. हिंदू संकल्पना सहिष्णू आणि स्नेहयुक्त आहे.’ या विधानात भगवान श्रीरामांचा उल्लेख पौराणिक व्यक्तिमत्त्व म्हणून केल्याबद्दल भाजपचे लोक संतापले आहेत. श्रीरामाचा उल्लेख भगवान श्रीराम असा राहुल गांधी यांनी त्यांच्या संबंधात विधान करताना केला आहे. पण श्रीरामांचा उल्लेख पौराणिक व्यक्तिमत्त्व म्हणून केल्याबद्दल भाजपच्या लोकांनी संताप व्यक्त केला आहे. हा संताप अनाठाई आणि हास्यास्पद म्हणावा लागेल. कुठूनही ओढून ताणून काहीही अर्थ लावायचा आणि राहुल गांधी यांच्यासारख्यांच्या विरोधात नाहक आगपाखड करायची या प्रकारालाही आता सत्ताधार्यांनी थोडा लगाम घालण्याची गरज आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात स्वतःच्या पक्षाच्या ध्येयधोरणानुसार रास्त आक्षेप घेतला, तर त्याला कोणाची ना असणार नाही, पण उठसूट राहुल जे काही बोलतात त्यावर क्षुल्लक खुसपट काढून जी राजकीय आतषबाजी होते ती उठवळ स्वरूपाची आहे, असे येथे खेदाने नमूद करावे लागेल. वस्तुस्थिती अशी आहे की, भारतीय जनता पक्षाचा आयटी सेल किंवा त्यांचे अन्य नेते राहुल गांधी यांची कितीही टिंगलटवाळी करीत असले तरी खुद्द मोदी सरकार मात्र राहुल गांधी यांच्या विधानाला गांभीर्यानेच घेत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. त्यातले अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे मोदी सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा आहे. गेले अनेक दिवस राहुल गांधी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा लावून धरीत आहेत. भाजपने कितीही विरोध केला तरी याच सभागृहात आम्ही सरकारला जातनिहाय जनगणनेचा निर्णय घ्यायला भाग पाडू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता आणि मुख्य म्हणजे सरकारने तो जसाच्या तसा मान्य केला. यामागे बिहारचे इलेक्शन किंवा सध्या पाकिस्तानच्या विरोधात युद्धाचे जे वातावरण सुरू आहे त्यावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळवण्याचा प्रकार सरकारकडून सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी राहुल गांधी यांचा आग्रह सरकारला मान्य करावा लागला आहे ही वस्तुस्थिती झाकता येत नाही. यापूर्वीही राहुल गांधी यांनी विदेशातल्या भूमीवरून केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर सातत्याने टीकेची झोड उठवली गेली, पण राहुल गांधी यांच्यापेक्षाही अत्यंत गंभीर विधाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी भूमीवर केली होती त्याचे दाखले काँग्रेसकडून वेळोवेळी दिले गेले. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत देशातील सर्व मुस्लीम संघटना आणि सर्व विरोधी पक्ष सरकारच्या पाठीशी एकजुटीने उभे आहेत आणि ते पाकिस्तानच्या विरोधात ठोस कारवाईची मागणी करीत आहेत. त्यामुळे या गंभीर विषयाला असल्या क्षुल्लक आक्षेपातून वेगळेच वळण दिले जात असल्याचे भान सत्ताधारी भाजपच्या लोकांनाही ठेवावे लागेल. देशापुढे काही गंभीर आणि निर्णायक क्षण येत असतात. अशावेळी देशातील एकोपा खराब होणार नाही किंवा ज्या विरोधकांनी सरकारला एकमुखी पाठिंबा दिला आहे त्या विरोधकांच्या मनात विनाकारण सरकार द्वेषाची भावना निर्माण होणार नाही याची खबरदारी सत्ताधार्यांनीच घ्यायची असते. ती खबरदारी घेण्यात आजचे सत्ताधारी कमी पडतात, असे चित्र या देशात निर्माण होता कामा नये.