केंद्रीय औषध नियंत्रण संघटना अर्थात ‘सीडीएससीओ’ने त्यांच्या अहवालात धक्कादायक माहिती दिली आहे. देशात वापरात असलेली 50 पेक्षा अधिक औषधे मानक दर्जाची नसल्याची त्यांनी घोषित केले आहे. ही औषधे त्यांनी गुणवत्ता आणि सुरक्षेच्या अनुषंगाने घेतलेल्या चाचणीत अपयशी ठरली आहेत. पॅरासिटामॉल, पॅन डी आणि कॅल्शियम सप्लिमेंट्ससह जी इतर औषधे आपल्याकडे अगदी सहजपणे घेतली जातात अथवा उपलब्ध होतात त्यात त्रुटी आढळून आली आहे. त्यावरून एकच बाब स्पष्ट होते की औषधांचे सेवन करणेही आता धोक्याचे बनले आहे. त्यातून प्रसंगी प्राणाशी गाठ पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. रुग्णाचा मग तो अगदी साध्या तापाचा रुग्ण असो अथवा दुर्धर आजाराने ग्रस्त असलेला रुग्ण असो पहिला विश्वास डॉक्टरांवर असतो. डॉक्टरांचा शब्द त्याला मोठा मानसिक आधार असतो. बर्याच रुग्णांचे 50 ते 80 टक्के आजारपण त्यातून बरे होते. उर्वरित काम त्यांनी दिलेली औषधे करतात. काही औषधे अशीही असतात की डॉक्टरांचा सल्ला न घेताच पूर्वानुभवावरून घेतली जातात. घरातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती किंवा सहकारी अथवा मित्र त्यांच्या अनुभवावरून एखाद्या गोळीचे अथवा सीरपचे नाव सुचवतात आणि ते औषध घेतले जाते. सामान्य पोटदुखी, सर्दी, खोकला अथवा कणकण जाणवणे यावेळी लोक असे प्रयोग करतात. बहुतेक वेळा ओळखीच्या औषधालयातून त्या विक्रेत्याच्या सल्ल्यानेही ती घेतली जातात. हे सर्रास झाले आहे. असे सगळे कथितपणे सुखेनैव सुरू असताना जर 50 पेक्षा अधिक औषधे चाचणीत अपयशी ठरल्याची बातमी येत असेल तर स्थिती गंभीर आहे. बरे ज्या औषधांची नावे समोर आली आहेत त्यातील काही सामान्य अॅसिडीटी अथवा तापासाठी घेतली जातात. ती इतकी परिचित नावे आहेत की बहुतांश वेळा डॉक्टरांना न विचारताच मनानेच घेतली जातात. याचा अर्थ जी औषधे आजारावरील उपचार म्हणून घेतली जात असल्याचा दावा केला जात होता, तीच औषधे अन्य कोणत्या धोक्याची वाहक होती का? तशी जर ती होती, जे आता सिद्ध झाले आहे, मग विकली कशी जात होती? गेल्या महिन्यातही दीडशे औषधांवर बंदी घातली गेली. त्यात प्रामुख्याने प्रतिजैविके अर्थात अँटीबायोटीक्स, मल्टीव्हिटॅमिन, वेदनाशामक म्हणजे पेनकिलर आणि सर्दी तापासाठी घेतल्या जाणार्या औषधांचा समावेश होता. या औषधांचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे त्यावेळी सांगितले गेले. गेल्या वर्षी आफ्रिकेतील एका देशात खोकल्याच्या एका औषधाबाबत धक्कादायक बातमी आली होती. भारतात एका ज्येष्ठ उद्योगपतीने त्यांच्या क्षेत्राशी संबंध नसलेल्या या बातमीकडे एका कार्यक्रमात लक्ष वेधले होते. संबंधित औषधामुळे त्या देशात 78 लहान मुलांच्या मूत्रपिंडाला धोका निर्माण झाला होता. यातील 66 दुर्दैवी बालकांचा त्यामुळेच मृत्यू झाला. यातील बहुतांश मुले दोन वर्षांपेक्षा कमी वयाची होती. तेथील आरोग्य अधिकार्यांना त्यांच्या तपासणीत एका बाबीची शंका आल्यावर त्यांनी तातडीने दोन औषधांचा वापर थांबवण्याचे निर्देश दिले होते. विशेष म्हणजे त्यात पॅरासिटामॉलचा आणि एका सीरपचा समावेश होता. जी भारतातही दिली जातात आणि साधारण त्याच वयोगटातल्या मुलांसाठी ती वापरली जातात. त्यावेळी करण्यात आलेल्या तपासात ही औषधे भारतातील एका कंपनीकडून आयात केली गेल्याचे आढळून आले होते. या कंपनीच्या चार उत्पादनांमध्ये मानवासाठी विषारी असणारे आणि मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकणारे घटक आढळून आले होते. गदारोळ झाल्यानंतर भारतातील औषध नियामकांनी चाचण्या घेतल्या. त्यांना संबंधित औषधांमध्ये कोणतेही अयोग्य घटक आढळले नाही आणि त्यांनी क्लीन चिट दिली. यात लाचखोरीचा प्रकार झाल्याचा दावाही करण्यात आला. पुढे काय झाले ते समोर आले नाही, मात्र आता एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधे चाचणीत अपयशी ठरल्याची बातमी आली. आता प्रश्न असा आहे की या यादीत ज्या औषधांचा उल्लेख आहे त्यांचे सेवन किती जणांनी केले असणार आणि त्यांच्या आरोग्यावर त्याचा काही विपरीत परिणाम झाला असेल का? विशेष गोष्ट म्हणजे या ज्या गुणवत्ता चाचण्या घेतल्या जातात त्यांच्या निष्कर्षांना संबंधित औषध निर्मात्या कंपन्याही फारसे महत्त्व देत नसल्याचेही आढळून येते. आफ्रिकेतील देशाचे उदाहरण त्यासाठी पुरेसे आहे. चौकशीच्या रडारवर आलेल्या कंपन्यांकडून पुन्हा एकदा स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. सर्वसामान्य लोकांना त्यांच्याबाबत सावध करण्यात आले आहे. हा केवळ सोपस्कार आहे. त्यातून प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत आणि कोणाचे नुकसान झाले असेल तर त्याचा दोष कोणाच्या माथी? गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरल्यानंतर आणि विक्रीवर बंदी घातली गेल्यानंतरही काही औषधांची बाजारात विक्री सुरू असते. ती ग्राहकांना उपलब्ध असल्याचेही यासंदर्भातील बातम्यांवरून स्पष्ट होते. गेल्याच आठवड्यात राजधानी दिल्लीतच मुदत संपलेल्या औषधांची विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले होते. यातून एकच बाब अधोरेखित होते की प्राण वाचवणारा हा व्यवसाय प्राणाला संकट निर्माण करणाराही ठरला आहे आणि ज्या बाबीची मनाई करण्यात आली आहे त्या बाबींची विक्री करण्यास खालच्या स्तरावर म्हणजे दुकानांच्या स्तरावर देखरेख करणारी यंत्रणाच उपलब्ध नाही आणि ती जर असेल तर तिला हे प्रकार रोखण्यात अपयश आले आहे.