जांबुत : मागील एक महिन्यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शिवन्या बोंबे, भागुबाई जाधव आणि रोहन बोंबे यांच्या घटनानंतर वनविभागाकडून बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. रोहन बोंबेच्या मृत्यूनंतर अलर्ट झालेल्या वनविभागाने ४८ तासांत एक बिबट जेरबंद करत नरभक्षक असलेल्या बिबट्याला ठार करण्यात यश मिळविले असून बुधवारी (दि.२०) रोजी रात्री आकरा वाजेच्या सुमारास पिंपरखेड (ता.शिरूर ) येथील पारगाव रोड परिसरात शेतकरी रामहरी बोंबे यांचे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात सहा वर्षीय नर संवर्गातील बिबट्याला जेरबंद करण्यात आले. तर मंगळवारी ( दि. १८ ) रोजी रात्री जुन्नर रोड परिसरातील वेताळबाबा वस्तीवर रेस्क्यू टीमच्या माध्यमातून तांत्रिक प्रणालींच्या आधारे धुमाकूळ घालणारा बिबट बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आला. दोन्हीही बिबट्यांना माणिकडोह (जुन्नर) येथील बिबट निवारण केंद्रात नेण्यात आल्याची माहिती सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी दिली. पिंपरखेड ,काठापूर खुर्द, जांबूत, फाकटे , चांडोह ,शरदवाडी , वडनेर खुर्द परिसरात बिबट्यांची संख्या मोठी असून झालेल्या हल्ल्यांची संख्या पाहता वनविभागाकडून विविध भागांत पिंजरे लावण्यात आलेले आहे. समूहाने फिरणाऱ्या बिबट्यांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. सध्याच्या काळात उसाचे तोडीचा हंगाम सुरु झाल्याने बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून उसाचे शेतातील त्यांचे वास्तव्य आता मका, ज्वारी यांचेसह शेतकऱ्यांच्या इतर पिकांमध्ये वाढू लागण्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली असून पिंजऱ्यांची संख्या वाढवून या बिबट्यांना वेळीच जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.