दुबई : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर गेले असून आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी आबुधाबीमधील अक्षरधाम स्वामीनारायण हिंदू मंदिराला भेट दिली. मध्यपूर्वेतील पहिल्या पारंपारिक हिंदू दगडी मंदिराला ही भेट भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील वाढत्या सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंधांना अधोरेखित करते. बीएपीएस याचा अर्थ बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था आहे. स्वामीनारायण हा जागतिक पातळीवरील एक प्रमुख हिंदू संप्रदाय आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच वर्षी १४ फेब्रुवारी रोजी उद्घाटन केलेले हे मंदिर आखाती प्रदेशात धार्मिक सहिष्णुता आणि विविधतेचे प्रतीक बनले आहे. डॉ. जयशंकर यांची भेट भारतीय समुदाय आणि आंतरराष्ट्रीय संबंध वाढवण्यामध्ये महत्वाची आहे. मंदिर भेटीनंतरजयशंकर लूवर अबुधाबी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले.
डॉ. जयशंकर हे यूएईचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाह्यान यांचीही भेट घेणार आहेत. दोघांनी भारत-यूएई सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी, तसेच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींच्या विस्तृत विषयांवर चर्चा करणे अपेक्षित आहे. अलीकडेच जयशंकर यांनी श्रीलंकेला भेट दिली आणि श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्देना यांची भेट घेतली होती.
त्यावेळी विविध विकास आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्पांद्वारे भारताच्या दृढ समर्थनाची ग्वाही देखील दिली होती.परराष्ट्र मंत्री म्हणून पुन्हा एकदा नियुक्ती झाल्यानंतर जयशंकर यांचा हा पहिलाच विदेश दौरा होता. भारताच्यावतीने श्रीलंकेमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांच्या प्रगतीबद्दल श्रीलंकेचे अध्यक्ष विक्रमसिंघे यांनी यावेळी समाधान व्यक्त केले होते.