जपान, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी जयशंकर यांची चर्चा

वॉशिंग्टन – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. क्वॉड गटाशी संबंधित मुद्यांवरही या नेत्यांशी जयशंकर यांनी वैचारिक आदान-प्रदान केली. अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या समारंभाला भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्यासाठी जयशंकर वॉशिंग्टनला गेले आहेत.
ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळातच ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेचा सहभाग असलेल्या क्वॉड गटाची स्थापना झाली होती. मावळते अध्य७ ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाने या गटाला नेतृत्वाच्या पातळीपर्यंत उंची प्राप्त करून दिली होती. ट्रम्प यांच्या भावी प्रशासनामध्ये मार्को रुबियो हे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री असणार आहेत.
अमेरिकन काँग्रेसने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिल्यानंतर आणि परराष्ट्र मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ते आंतरराष्ट्रीय बैठकींच्या बाबतीत क्वाड मंत्रीपद प्राधान्याने निर्माण करतील. हे काम त्यांच्यासाठी प्राधान्यक्रमाने अग्रस्थानी असणार आहे, अशी अपेक्षा आहे. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात क्वॉड गटाला महत्व देण्यासाठी क्वॉड मंत्रीपद निश्चित केले जाणे महत्वाचे मानले जाते आहे.
ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी आयवाया यांच्याशी क्वॉड गटाच्या प्रगतीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली, असे जयशंकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रुबियो आणि नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंधांना पुढील स्तरावर नेण्यास प्राधान्य दिले आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे. रुबियो हे परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच जयशंकर यांच्याशी त्यांची द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे.





