परदेशी गुंतवणूकदारांचं भारतीय बाजारात पुनरागमन; एका आठवड्यात ₹1,751 कोटींची निव्वळ खरेदी

नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्ध सुरू केल्यानंतर आणि भारताविरोधात आयात शुल्क वाढवून 50 टक्के केल्यानंतर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतात एकतर्फी विक्री केली होती. त्यामुळे मुख्य निर्देशांकावरही परिणाम झाला होता. मात्र सरलेल्या आठवड्यात या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात खरेदी केल्याची आकडेवारी समोर आली आहे.
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड म्हणजे एनएसडीएलने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 6 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 1,751 कोटी रुपये ची निव्वळ खरेदी केली आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली असली तरी शेअर बाजार निर्देशांकावर जास्त परिणाम झाला नाही. कारण ही तूट देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी भरून काढली होती. कारण दीर्घ पल्ल्यात या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे देशातील गुंतवणूकदारांना वाटत होते.
रॅलीगेअर ब्रोकिंग या संस्थेचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले की, या आठवड्यामध्ये मध्यपूर्वेत शांतता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताची स्थूल अर्थव्यवस्था भक्कम आहे. जीएसटी सुधारणामुळे देशांतर्गत बाजारपेठ विस्तारात आहे.
त्यामुळे परदेशी गूंतवरूकदार पुन्हा कमी प्रमाणात का होईना भारतामध्ये गुंतवणूक करीत असल्याचे वातावरण आहे. जर जागतिक पातळीवर अचानक काही नकारात्मक घडामोडी घडल्या नाहीत तर हे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी वाढवीत राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत निर्देशांकांना चांगला आधार मिळू शकेल.
सरलेल्या आठवड्यात या गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढली असली तरी सप्टेंबरमध्ये या गुंतवणूकदारांनी 23,885 कोटी रुपयांची विक्री केली आहे. चालू वर्षांमध्ये आतापर्यंत एक 56,611 कोटी रुपयांची विक्री केली आहे. जानेवारीपासून एप्रिल, मे, जून वगळता इतर महिन्यात या गुंतवणूकदारांनी विक्री केली.





