Stock Market: विदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि सकारात्मक जागतिक संकेत; निफ्टी सलग 6व्या दिवशी वधारला

मुंबई – अमेरिका -चीन दरम्यान व्यापार करार चर्चा सकारात्मक पातळीवर चालू असल्यामुळे जागतिक शेअर बाजारात खरेदीचे वातावरण होते. अशातच भारतीय शेअर बाजारात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची खरेदी चालू असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सलग सहाव्या दिवशी वाढला हे आजच्या कामकाजाचे वैशिष्टय होते.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 123 अंकांनी वाढून 82,515 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 37 अंकांनी म्हणजे 0.15 टक्क्यांनी वाढवून 25,141 अंकावर बंद झाला.
एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिन्स सर्व, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, नेस्ले, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिडकॅप आणी स्मॉल कॅप मधील कंपन्यांच्या शेअरची विक्री करून नफा काढून घेतला जात आहे. मात्र संस्थागत गुंतवणूकदार मुख्य निर्देशांकाशी संबंधित ब्लूचिप कंपन्यांच्या शेअरची खरेदी करीत असल्यामुळे मुख्य निर्देशांक वाढण्यास मदत मिळत आहे.
वाहन आणि आयटी कंपन्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा आहे. कारण वाहन कंपन्यांच्या विक्रीत बर्यापैकी वाढ झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. तर अमेरिका – चीन व्यापार बोलणी यशस्वी झाल्यास अमेरिकेतून आयात वाढेल या दृष्टिकोनातून माहिती तंत्रज्ञान कंपन्या तेजीत आहेत.
अमेरिका -चीन व्यापार बोलणी फलदाई होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे जागतिक शेअर बाजारात आज खरेदीचे वातावरण होते. दक्षिण कोरिया, जपान, तैवान, चीन आणि हाँगकाँगसह युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. या कारणामुळे भारतीय शेअर बाजारातही खरेदीचे वातावरण होते असे जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले.
परदेशी गुंतवणूकदाराकडून खरेदी –
अमेरिकन डॉलर अजूनही कमकुवत पातळीवर आहे. अशा परिस्थितीत भारताची स्थूल अर्थव्यवस्था भक्कम असल्यामुळे दीर्घ पल्ल्यात भारतातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार गेल्या पंधरा दिवसापासून भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत असून मंगळवारी या गुंतवणूकदारांनी 2,301 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.





