Stock Market: विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरमध्ये विकले 1 लाख कोटी रुपयांचे शेअर

मुंबई – परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून बरीच गुंतवणूक काढून घेतली. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत या गुंतवणूकदारांनी खरेदी एेवजी केवळ विक्री केली असल्याचे दिसून येत आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात जवळजवळ एक लाख कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातही या गुंतवणूकदाराकडून विक्रीचा असाच मारा चालूच असून आतापर्यंत या गुंतवणूकदारांनी 19,994 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे.
शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 3,404 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मात्र या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी भारत सरकारकडून कसलेही प्रयत्न आतापर्यंत तरी करण्यात आलेले नाहीत. भारतातून काढून घेतलेली गुंतवणूक हे गुंतवणूकदार चीनमध्ये वापरत आहेत. चीनने गेल्या महिन्यात दोन वेळा स्थानिक उद्योगांच्या वाढीसाठी पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे चीनमधील कंपन्यांकढून जास्त परतावा मिळेल या दृष्टीकोनातून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतात विक्री करून चीनमध्ये गुंतवणूक करीत आहेत.
आतापर्यंत देशातील संस्थागत गुंतवणूकदार निर्देशांकांना आधार देण्यासाठी खरेदी करत होते. मात्र गेल्या आठवड्यात देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदी कमी केली आहे. त्यामुळे शेअर नर्देशांकात बरीच घट झाली आहे. भारतीय कंपन्यांनी दुसर्या तिमाहीत सुमार ताळेबंद जाहीर केले आहेत. कारण शहरी भागातून मागणी कमी झाली आहे. याचा सर्वात जास्त फटका वाहन कंपन्या आणि ग्राहक वस्तू तयार करणार्या कंपन्यांना बसत आहे.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार येणार असल्याने भारतातील गुंतवणूकदार सावध असल्यामुळे निर्देशांकावर परिणाम होत असल्याचे दिसून येते. या घडामोडीचा भारतातील परकीय चलन साठ्यावर परिणाम होत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून भारतातील परकीय चलन साठा कमी झाल्याची आकडेवारी रिझर्व बँकेने जाहीर केले आहे.




