परकीय चलन साठ्यात एका आठवड्यात 4.8 अब्ज डॉलर घट

मुंबई- रिझर्व बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार 16 मे रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलन साठ्याचे मूल्य 4.8 अब्ज डॉलरने कमी होऊन 685.7 अब्ज डॉलर या पातळीवर गेले. या आठवड्यामध्ये रुपयाच्या मूल्यात बरीच घसरन झाली. त्याचबरोबर रोखे आणि शेअर बाजारातील परकीय गुंतवणूक कमी झाल्यामुळे भारताकडील परकीय चलन साठ्यात घट झाली असल्याचे दिसून आले.
त्याअगोदरच्या भारताकडील परकीय चलन साठा 4.5 अब्ज डॉलरने वाढून 690 अब्ज डॉलर या पातळीवर गेला होता. भारताकडे सध्या असलेला परकीय चलन साठा समाधानकारक पातळीवर आहे. या चलनातून भारताला जवळजवळ दीड वर्षाची आयात करता येऊ शकणार आहे.
दरम्यान संबंधित आठवड्यामध्ये जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी झाला. यामुळे रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य आठवड्यात 5.1 अब्ज डॉलरने कमी होऊन 81.21 अब्ज डॉलर या पातळीवर गेले.
भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे ठेवलेल्या ठेवीचे मूल्य या आठवड्यात 4 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 4.3 अब्ज डॉलर या पातळीवर गेले. भारताकडील परकीय चलन साठ्यांची परिस्थिती कमालीची मजबूत असली तरी भारत परकीय चलन संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे. अनेक देशाबरोबर मुक्त व्यापार करार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

