मुंबई: विरोधी पक्षाच्या आघाडीकडे अजूनही जागावाटप नीट होत नसून त्यांच्याकडे एक नेता ठरत नाही. राज्यामध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना असं वाटतंय की त्यांचं कोणी ऐकत नाही. शरद पवार एकदा लढायचं म्हणताहेत, एकदा लढायचं नाही म्हणताहेत. म्हणजेच कुठेही ना शेंडा ना बुडखा… ना आकार ना उकार. अशी विरोधी पक्षांची एक मोट जबरदस्तीने बांधण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्या हातात देश द्यायचा काय?, असा प्रश्न शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ला मुलाखत दिली. दरम्यान त्यांनी अनेक राजकीय खुलासे केले.
काँग्रेसमुक्त भारतवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी काँग्रेसमुक्त देश असं बोलतच नाही. मी काँग्रेस नष्ट करा असं कधी बोलत नाही. कारण विरोधी पक्ष राहिलाच पाहिजे… मला आजही आठवतंय, शिवसेनाप्रमुखांनी मागे मला सांगितलं होतं… उद्धव, एक लक्षात ठेव. मुख्यमंत्र्यावर तर जबाबदारी असतेच, पण विरोधी पक्षनेत्यावर त्याहून मोठी जबाबदारी असते! कारण विरोध करणं म्हणजे आकांडतांडव करणं नाही. त्याच्यावरसुद्धा जबाबदारी असते. जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्याला जास्त पार पाडावी लागते. तसं जर का बघितलंत तर कुणालाही नष्ट करा असं मी कधी म्हणत नाही… नष्ट करा किंवा काँग्रेसमुक्त…हे मुक्त, ते मुक्त या अशा फालतू कल्पना माझ्याकडे नाहीत. फक्त आज काँग्रेसची अवस्था ही निर्नायकी आहे हे नक्की. त्यांच्याकडे तशा उंचीची नेते मंडळी नाहीत… जसे नरसिंह राव होते, नक्कीच होते. नरसिंह रावांनी नक्कीच चांगले काम केले.