नवी दिल्ली – जून महिन्यामध्ये होणाऱ्या WTC चॅम्पियन चा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया असा रंगणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती, यामध्ये के एल राहुलचा देखील समावेश होता. जर तो वेळेत तंदुरुस्त झाला नाही तर लखनऊ आणि भारत दोघांनाही त्याच्या बदलीबद्दल विचार करावा लागणार आहे. असे संकेत बीसीसीआयकडून देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने WTC फायनलसाठी के. एल. राहुलच्याऐवजी ईशान किशनला संघामध्ये स्थान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
केएल राहुलच्या बदलीसोबतच बीसीसीआयने तीन स्टँडबाय खेळाडूंची नावेही जाहीर केली आहेत. यात सलामीवीर ऋतुराज गायकवाड, वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. हे तिन्ही खेळाडू टीम इंडियासोबत इंग्लंडला जाणार आहेत.
दरम्यान, सध्या सुरु असलेल्या आयपीएल हंगामामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना केएल राहुल जखमी झाला होता. त्याच्या मांड्यांमध्ये क्रॅम्प आला होता. यानंतर राहुलचे स्कॅन करण्यात आले. त्यानंतर राहुल आयपीएल 2023 मधून बाहेर पडला. मात्र, त्यानंतर आता तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भाग घेऊ शकणार नाही, अशी अटकळ सतत बांधली जात होती.