जीवनगाणे: कशासाठी… पोटासाठी…

अरुण गोखले

भरदुपारच्या उन्हात जे चित्र पाहिलं, तेच दोन दिवसांनी प्रभात दैनिकाच्या लक्षवेधी फोटोमध्ये पुन्हा एकदा पाहिले. भरदुपारच्या उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना, ती डोंबाऱ्याची छोटीशी पोर उंच दोरीवर चालत होती. खाली वाजणाऱ्या ढोलकीच्या तालावर ती तिचा तोल सांभाळत, हातातील तोलकाठी सावरत, डोक्‍यावरची परात आणि पायाखालची दोरी जराही इकडे तिकडे न होऊ देता एका विलक्षण एकाग्रतेने दोरीवरून मागे पुढे ये-जा करत होती.

हे सारं का आणि कशासाठी? या मनात जागणाऱ्या प्रश्‍नाचं उत्तर एकच होत. ते म्हणजे “ये तो पेटका सवाल है।’

पोट… देवाने माणसाला दीड वितीचे पोट सोबत बांधून दिले आहे आणि त्या पोटासाठीच त्याची आयुष्यभर वणवण, काबाड कष्ट, अंग मेहनत, शारीरिक आणि बौद्धिक परिश्रमाची मेहनत सुरू असते. कशासाठी? तर स्वत:च्या आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या तोंडी चार सुखाचे घास पडावेत म्हणून.

पण वास्तवात मात्र सर्वांचीच भूक सारख्याच प्रकारे भागते असं मात्र दिसत नाही. हवं हवं म्हणून मागून घेऊन आणि नको म्हणून तसंच ताटात टाकून कोणी उठत असतो, तर कुणाला मात्र उष्ट्या पत्रावळीवरची शिते वेचण्याची वेळ येते.

सर्वांची भूक एक असतानाही ती कोणाची भागते तर कोणाची भागत नाही. इथे मुखी कोणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार… हा विरोधाभास पाहिला, अर्धपोटी पाणी पिऊन निजणारे कष्टकरी जीव पाहिले की पुन्हा तोच प्रश्‍न डोक वर काढतो की या पोटासाठी करायचं तरी काय?
कारण पोटाची भूक भागली नाही तर हातपाय चालत आहेत. डोकं काम करत नाही. चित्त थाऱ्यावर राहात नाही, आणि मग एका बेभान प्रसंगी माणूस हा माणूस राहात नाही. सरळ मार्ग टाकून आडमार्गाने ती पोटाची आग भागवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातच तो कधी दोषी, पापी अन्‌ दुराचारी ठरतो.

खरं तर हे असं होता कामा नये. प्रत्येकालाच निदान त्याच्या पोटाची भूक भागेल इतकं तरी मिळायलाच हवं. अन्न हे परब्रह्म म्हणत असताना त्या परब्रह्मानेच कोणाकडे पाठ फिरवावी हे मात्र पटत नाही. जीवनातलं हे भयानक सत्य पाहिलं की पोटात तुटल्या शिवाय आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.