Train is ready to run on hydrogen gas: तंत्रज्ञान आणि रेल्वेच्या आधुनिकीकरणामध्ये भारत आता एक ऐतिहासिक पाऊल टाकत असून नवीन वर्ष २०२६ मध्ये देशाला पहिली हायड्रोजन ट्रेन मिळणार आहे. हरियाणातील जींद ते सोनीपत या ९० किलोमीटरच्या मार्गावर ही ट्रेन धावण्यासाठी आता पूर्णपणे सज्ज झाली आहे. या आठवड्यात जींद रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या ‘लोड चेक’ची अंतिम चाचणी पार पडणार असून, यशस्वी चाचणीनंतर पंतप्रधान कार्यालयाकडून हिरवा कंदील मिळताच या ट्रेनचे नियमित संचलन सुरू होईल. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ही ट्रेन अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. रेल्वे अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रेनमध्ये ९ किलो पाण्यापासून ९०० ग्रॅम हायड्रोजन इंधन तयार करण्याची क्षमता आहे, ज्याच्या मदतीने ही ट्रेन एक किलोमीटरचे अंतर पार करू शकेल. ताशी १५० किलोमीटर इतका उच्च वेग गाठण्याची क्षमता असलेली ही ट्रेन अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा एक उत्कृष्ट नमुना ठरणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी स्पेनच्या कंपनीने जींद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन गॅस उत्पादनाचा हाय-टेक प्लांट उभारला आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आलेले १६ कोच आणि ४ ड्रायव्हर पॉवर कार आधीच शकूर बस्ती स्थानकावर दाखल झाल्या आहेत. येत्या २६ जानेवारीपासून २ डीपीसी आणि ८ प्रवासी कोचसह जींद-सोनीपत दरम्यान ९० किलोमीटरचा अधिकृत ट्रायल रन सुरू केला जाईल. या चाचणीचा अहवाल भारतीय रेल्वे, आरडीएसओ आणि स्पेनची ग्रीन एच कंपनी संयुक्तपणे तयार करणार आहे. या हायड्रोजन ट्रेनमध्ये मेट्रोच्या धर्तीवर डिजिटल डिस्प्ले सिस्टम आणि दोन्ही बाजूंना स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत. ट्रेनमधील वातानुकूलित यंत्रणा, दिवे आणि पंखे हे सर्व हायड्रोजन ऊर्जेवरच चालवले जातील. प्लांटच्या संचालनासाठी १.५ मेगावॅटचे वीज कनेक्शन घेण्यात आले असून, येथे ३,००० किलो हायड्रोजन आणि ७,६८० किलो ऑक्सिजन साठवणुकीची मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. हरियाणाचे विधानसभा उपाध्यक्ष आणि जींदचे आमदार डॉ. कृष्ण मिड्ढा यांनी या प्रकल्पावर समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, हिंदुस्थानचा सर्वात मोठा हायड्रोजन प्लांट जींदमध्ये असणे ही स्थानिक लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही ट्रेन केवळ वाहतुकीचे साधन नसून ती संपूर्ण देशासाठी ‘ग्रीन टेक्नॉलॉजी’चा एक मॉडेल ठरेल. यामुळे आरोग्य, शिक्षण आणि स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्था सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.