साताऱ्यात पहिल्यांदाच सिनेमा महोत्सवाचे दमदार उद्घाटन

म्हसवड – येथील माणदेशी फाउंडेशन आणि मेन अगेस्टं व्हायलन्स अँड अब्युज (MAVA) यांच्या संयुक्त विद्यमानाने म्हसवड येथे पहिल्यांदाच सिनेमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. वास्तविक पाहता माण तालुक्यांमध्ये एकही सिनेमागृह नसल्याने सिनेरसिक नेहमीच परगावी सिनेमा पाहण्यास जात असतात, परंतु सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या माणदेशी फाउंडेशनने मावा संस्थेच्या मदतीने सातारा जिल्ह्यात प्रथमच सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांच्या सिनेमा महोत्सवाचे यशस्वी नियोजन केले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन काल सकाळी दहा वाजता सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच मावा संस्थेचे कार्यकारी संचालक हरी सदानी आणि माणदेशी चॅम्पियनचे संस्थापक प्रभात सिन्हा यांच्या हस्ते झाले. आजकाल डिजीटल मीडियाच्या जमान्यात सिनेमागृहांकडे जरी ओढा नसला तरी सामाजिक आशय असणारे चित्रपट हे सिनेमागृहामध्ये पाहायला मिळत नाहीत, त्यामुळे हा सिनेमा महोत्सव रसिकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.
दोन दिवस चालणारे या महोत्सवामध्ये आमद, पारलिंगी, नटखट, औम्ब, तळ बॉटम लँड आणि संडे असे सामाजिक असे असलेले सिनेमे दाखवले जाणार आहेत. हा महोत्सव २५ आणि २६ जानेवारी असे दोन दिवस राहणार आहे. याप्रसंगी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शन तसेच माणदेशी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.





