मेट्रो उभारणीसाठी पुणे पालिका इमारतीतील ‘त्या’ झऱ्याचे पाणी

प्रशासनाकडून वापरण्याचा विचार : शिवाजी लंके यांची माहिती

पुणे – महापालिका भवनच्या विस्तारीत इमारतीखाली आढळलेल्या जलस्त्रोतातील पाण्याचा वापर मेट्रोच्या कामासाठी करण्याचे महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन असल्याचे भवन विभागाचे अधिकारी शिवाजी लंके यांनी सांगितले.

महापालिका भवनच्या मागील बाजूस विस्तारीत इमारत बांधण्यात आली आहे. ही इमारत बांधताना दुमजली पार्किंगसाठी खोदाई करण्यात आली आहे. हा परिसर नदीजवळच असल्याने खोदाईनंतर जलस्त्रोत आढळून आले. यामुळे इमारतीच्या पायाचे काम करताना लाखो लिटर पाणी उपसावे लागले. याच ठिकाणी महापालिकेने टाकी बांधून जलसंचय केला आहे. असे असतानाही तळघरामध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी साचत असल्याने इमारतीच्या स्ट्रक्‍चरला धोका निर्माण होत आहे. या पाण्याचा वापर करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत होते. या पाण्याची क्वालिटीही प्रयोगशाळेत तपासण्यात आली आहे. हे पाणी टॅंकरद्वारे शहरात देण्याची यंत्रणा उभारण्याविषयी प्रशासन विचार करत आहे. परंतु, महापालिका भवनातून टॅंकर भरून ते पाठवणे शक्‍य नाही. त्यासाठी लाईन टाकून नदीपात्रात टॅंकर भरणा पॉईंट करता येईल का याचाही विचार सुरू होता. मात्र, त्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. जुन्या इमारतीप्रमाणेच नव्या इमारतीमध्ये “रेन वॉटर हार्वेस्टिंग’ यंत्रणा उभारण्यात येणार आहे. ही इमारत बांधतानाच याचा विचार करण्यात आला नाही.

दररोज 10 ते 12 टॅंकर पाणी मिळण्याची शक्‍यता
महापालिकेच्या भागात मोठ्याप्रमाणात मेट्रोचे खांब उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी पाण्याची गरज पडते. त्यामुळे त्या कामाला हे पाणी वापरता येऊ शकते. सध्या याठिकाणी दररोज एक ते दीड लाख लिटर पाणी अर्थात 10 ते 12 टॅंकर पाणी मिळू शकते, असा प्राथमिक अंदाज आहे. येत्या काही कालावधीत धान्य गोदाम येथे मेट्रोच्या जंक्‍शनचे काम हाती घेण्यात येणार आहे. येथील बांधकामासाठीही या पाण्याचा वापर करावा, याबाबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून बोलणी सुरू आहे. महापालिकेच्या विस्तारीत इमारतीतील स्वच्छतागृहांसाठी हे पाणी वापरण्याचाही विचार सुरू असल्याचे लंके यांनी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)