भर रस्त्यात पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी

दारू पिण्यास पैसे न दिल्याने केले होते ब्लेडने वार
पुणे – दारू पिण्यास पैसे न दिल्याने भर रस्त्यात पत्नीवर ब्लेडने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला सात वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावणी. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. मणेर यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त पाच महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

इस्माईल बळीराम सूर्यवंशी ( वय 35, रा. पिंपरी) असे त्याचे नाव आहे. याबाबत त्याची जखमी पत्नी सुनीता ( वय 30) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 16 मे 2017 रोजी सकाळी 9.45 च्या सुमारास पिंपरी, मोरवाडी येथील अमृतेश्‍वर सोसायटीजवळ घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. त्यामध्ये जखमी फिर्यादी, डॉक्‍टर आणि ज्या पंचासमक्ष त्याने गुन्ह्यातील ब्लेड काढून दिले, त्या पंचाची साक्ष महत्वाची ठरली. ईस्माईल याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन सुनीता यांना मारहाण करत असत. घटनेच्या पूर्वी तो दोन दिवस घरी आला नव्हता. त्या कामाला चालल्या असतान रस्त्यात त्याने दारू पिण्यास पैसे मागितले. मात्र, पैसे देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्याने गालावर आणि गळ्यावर ब्लेडने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यांनी स्वत:च्या हाताने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना नवऱ्याने वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. तर, व्यक्ती स्वत: वर असे वार करणे शक्‍य नसल्याचा डॉक्‍टरांनी दिलेला जबाब ऍड. बोंबटकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. तसेच, त्याचा हेतू त्यांना जीवे ठार मारण्याचा होता. पूर्व तयारीते तो गुन्हा करण्यासाठी ब्लेड घेऊन गेला होता. त्याचे कृत्य समाजविरोधी आहे. त्याने असहाय्य पत्नीवर जीवेघेणा हल्ला केला आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. बोंबटकर यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.