प्रभात वृत्तसेवा पुणे – पुढे जाण्यासाठी जागा दिली नसल्याच्या कारणातून क्रेटामधील तिघांनी दुसऱ्या कारमधील तरुणाच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. भरदुपारी वर्दळीच्या चौकात लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आरोपींनी क्रेटामधून पलायन केले.ही खळबळजनक घटना शनिवारी दुपारी एक वाजता सेनापती बापट रस्त्यावरील वर्दळीच्या वेताळबाबा चौकात घडली. हल्ल्यात जखमी झालेला पृथ्वीराज कुमार नरवडे ( १९, रा. भोसलेनगर, गणेशखिंड रस्ता) हा सेनापती बापट रस्त्यावरून कारने निघाला होता. त्यावेळी महेश प्रमोद पवार ( २९), रोहित अशोक धोत्रे ( २४), आकाश विलास कुसाळकर (वय ३४, रा. वडारवाडी) हे तिघे पाठीमागून क्रेटातून येत होते. पृथ्वीराज आणि आरोपी परस्परांना ओळखत नाहीत. क्रेटाला पुढे जाण्यास जागा दिली नसल्याने आरोपींनी पृथ्वीराजला शिवीगाळ करुन त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर क्रेटामधून त्याचा पाठलाग केला. सेनापती बापट रस्त्यावरील गजबजलेल्या वेताळबाबा चौकात आरोपींनी पृथ्वीराज याच्या कारसमोर आपली कार आडवी घातली. आरोपींनी पृथ्वीराजला कारमधून बाहेर ओढले. त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. एका आरोपीने पृथ्वीराजच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. तुला आता जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिघेजण क्रेटामधून पळून गेले. भर चौकात कारचालकावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याने घबराट उडाली. या घटनेची माहिती माहिती मिळताच चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींना अटक केली. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसंनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.सहायक पोलीस निरीक्षक शोभा भांडवलकर तपास करत आहेत.