NCP Merger : ‘शरद पवारांच्या पक्षात मंत्रीपदासाठी…’; ठाकरे गटाच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
NCP Merger : यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता व्यक्त केल्याने राजकीय वातावरण आणखी तापले.

NCP Merger : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे आणि प्रतिदावे केले जात असताना राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी विलिनीकरणाच्या चर्चा थंडावल्याचे चित्र होते.
मात्र, शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावेळी पटेल यांनी शरद पवारांना ‘आपण 10 तारखेनंतर बसून बोलू’, असे म्हटल्याचे व्हिडिओतून दिसून आले. त्यानंतर पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला.
यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता व्यक्त केल्याने राजकीय वातावरण आणखी तापले. आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणावर परखड भाष्य करण्यात आले आहे. या अग्रलेखातून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.
या खेळात कोण कोणात विलीन होणार, हा पुढचा प्रश्न आहे
‘शरद पवारांच्या पक्षात मंत्रीपदासाठी हपापलेले दोन-चार लोक असू शकतात. त्यांच्यासाठी शरद पवारांनी त्यांच्या जीवनाची इतकी वर्षे जपलेले सत्त्व नष्ट करावे, हे योग्य नाही. या खेळात कोण कोणात विलीन होणार, हा पुढचा प्रश्न आहे. भाजपच्या पायाशी बुटचाटेगिरी करणाऱ्या गटाशी शरद पवारांनी चर्चा करत बसावे आणि त्यामुळे महाराष्ट्रात संभ्रम व संशयाचे वातावरण निर्माण व्हावे, हे राज्याच्या परंपरेला शोभणारे नाही,’ अशा शब्दांत ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.
विलीनीकरणाचा खेळ दिवसेंदिवस हास्यास्पद ठरत आहे
तसेच शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांसारख्या नेत्यांनी या राजकीय खेळात वाहवत जाऊ नये, असा सल्लाही अग्रलेखातून देण्यात आला आहे. ‘विलीनीकरणाचा खेळ दिवसेंदिवस हास्यास्पद ठरत आहे,’ असे म्हणत या संपूर्ण चर्चेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
दरम्यान, सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत परिस्थितीवरही ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना काम करावे लागत असल्याने त्यांची राजकीय घुसमट सुरू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पटेल आणि तटकरे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आपले नेते मानतात; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता पार्थ पवार असल्याचेही अग्रलेखात म्हटले आहे.
याशिवाय जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार, तर सुप्रिया सुळे केंद्रात जाणार, अशा चर्चांचाही उल्लेख करण्यात आला आहे. विलिनीकरणाच्या नावाखाली अफवा आणि बातम्यांचे चेंडू एका बाजूने दुसऱ्या बाजूला फेकले जात असल्याची टीका करण्यात आली आहे.





