गळ्यातील पडलेली सोनसाखळी मिळवून देण्याच्या अमिषाने केले हे कृत्य
पुणे – पोलीस असल्याची बतावणी करून महिलेच्या गळ्यातून पडलेली सोनसाखळी परत मिळवून देण्याच्या अमिषाने तिच्यावर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी.पी.अग्रवाल यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
श्रीकांत लक्ष्मण डोईफोडे (वय 27, रा. शिरूरघाट, ता. केज, जि. बीड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 24 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना 14 एप्रिल 2015 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुरेश गवळी यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित फिर्यादी आणि डॉक्टरांची साक्ष महत्तवाची ठरली. हेड कॉन्स्टेबल संजय जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमित झगझाप यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. मी क्राईम ब्रॅंचचा पोलीस अधिकारी आहे, पडलेली सोनसाखळी शोधून देण्याचे अमिष दाखवून त्यांना लॉजवर नेवून बिअर पाजली. त्यांच्यावर बलात्कार केला. त्यानंतर लग्नाच्या अमिषाने त्यांच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार) नुसार 10 वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंड, भादवी कलम 170 (पोलीस असल्याची बतावणी करणे) नुसार 1 वर्षे शिक्षा, भादवी कलम 328 (गुन्हा करण्याच्या हेतून नशेचा पदार्थ पाजणे) नुसार 5 वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.