वस्तीतील पावलांची चांगल्या मार्गाकडे वाटचाल

पुणे – वस्तीमधील मुलांमध्ये भाईगिरीचे आकर्षण मोठे असते. यातूनच त्यांची पावले गुन्हेगारीकडे वळतात. मात्र, ही पावले गुन्हेगारीकडे न वळता थोर व्यक्तींच्या यशोगाथा सांगून तसेच शिक्षणाबद्दल आकर्षण निर्माण करून एका चांगल्या मार्गाकडे वळवली जात आहे.
यातूनच वस्तीतील काही मुले डॉक्टर ,इंजिनिअर आणि पोलीसही झाली आहे. यासाठी पुण्यातील एक सेवा सहयोग फाऊंडेशन संस्था धडपड करत आहे. त्यांनी आजवर अशा हजारो मुलांना अभ्यासाची ओढ लाऊन चांगला व्यक्ती बनण्यास मदत केली आहे. यातीलच अनेक मुले पुढे संस्थेसाठी स्वयंसेवक म्हणूननही काम करत आहेत.
ज्येष्ठ महिला स्वयंसेवकाची धडपड
या संस्थेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक स्वयंसेवक कार्यरत आहेत. ते आपला काम धंदा सांभाळून संस्थेला वेळ देतात. अशाच एक स्वयंसेवक म्हणजे ६२ वर्षीय उत्तरा शिरीष सुमंत आहेत. त्या या कार्यात २००४-२००५ पासून झोकून देऊन काम करत आहेत. त्यांनी दै.प्रभातशी बोलताना सांगितले की माझी मुले शाळेत जात होती. परंतु त्याच वेळी रस्त्यावर फिरताना मी अनेक मुले पाहिली, जी शिक्षणापासून वंचित होती.
मी त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. मी सुरुवातीला दांडेकर पुलाजवळ सिंहगड रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे वसाहत येथे वस्तीतील मुलांसाठी वर्ग सुरू केले. मुलांच्या शाळेच्या वेळेनंतर त्यांना शिकविते. आता सेवा सहयोग फाऊंडेशनशी संलग्न आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये फाऊंडेशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध क्लासरूम आहेत. जवळपास तीन वर्षे मुलांना शिक्षण दिल्यानंतर, विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली.
त्यांच्या पालकांनी माझ्यावर आणि संस्थेवर विश्वास ठेवला. पण यामुळे माझे काम वाढले. त्यानंतर फाउंडेशनचे आणि मी २००९ मध्ये एकत्र काम करू लागलो. सुरुवातीला, वस्तीतील वर्ग उघड्यावर घ्यायचो. २००९ मध्ये पाऊस सुरू झाला तेव्हा आम्ही वारजे येथील रामनगर भागात विद्यार्थ्यांना शिकवत होतो. तेव्हा एक स्थानिक रहिवाशाने आम्हाला एका समाज मंदिरात (कम्युनिटी हॉल) नेले आणि आम्ही तिथे विद्यार्थ्यांना शिकवू लागलो.
फाऊंडेशन आता इयत्ता पहिली ते दहावी दरम्यान शिकणाऱ्या ५,५०० मुलांसाठी ६३ वर्ग चालवते. मुलांना शिकवून त्यांना विविध व्यवसाय करण्याबद्दल योग्य मार्गदर्शन करणे, तसेच त्यांना व्यसने आणि भाईगिरीपासून दूर ठेवत आहोत. फाऊंडेशनचे १५० स्वयंसेवक वेगवेगळ्या वस्त्यांमधील मुलांसाठी काम करतात. या वर्गातून पुढे शिक्षण घेऊन काही विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, पोलीस कर्मचारी आणि इतर सरकारी अधिकारी झाले आहेत. आम्ही त्या सर्वांना आमच्या वर्गात बोलवतो आणि ते त्यांच्या संघर्षाचे आणि वैयक्तिक ध्येय कसे साध्य करायचे, याबद्दल सांगतात. यामुळे मुलेही स्वत:चे धेय्य ठरवून तसा प्रयत्न करतात.
फाऊंडेशनचे स्वयंसेवक दत्तात्रय सकट म्हणाले, “आमच्या विद्यार्थ्यांनी काहीतरी शिकण्यासाठी प्रवासात जास्त वेळ घालवायचा नाही. तसेच त्यांच्याच प्रमुख वस्त्यांमध्ये वर्ग भरवतो. सीया जाधव या स्वयंसेविका म्हणाल्या, “मुलींना आमच्या वर्गात आणणे हे एक आव्हान होते. पालक त्यांच्या मुलींना वस्तीबाहेर पाठवायला तयार नव्हते. त्यामुळे स्वयंसेवकांनी पालकांचे सुमपदेशन करुन मुलींना वर्गावर आणण्यास प्रवृत्त केले. आता आमच्या वर्गांमध्ये ६० टक्के मुली आहेत.
“वस्तीतील मुले व्यवहारात स्मार्ट आहेत. पण त्यांना गणित आणि भाषा शिकण्यासाठी धडपड करावी लागते. यामुळे आमची टीम गणित आणि भाषांवर लक्ष केंद्रित करत आहे.” – उत्तरा शिरीष सुमंत (ज्येष्ठ स्वयंसेवक)





