पायी पालखीस परवानगी द्यावी; वारकरी संप्रदायाची मागणी

पुणे – करोनाच्या संकटामुळे मागील वर्षी आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्याऐवजी एसटी बसने पालखी पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या. यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आग्रही आहे.
वारकरी संप्रदायाने यंदा मर्यादित स्वरूपात, करोनाचे सर्व नियम पाळून वारकऱ्यांना पायी पालखी सोहळ्यासाठी परवानगी द्यावी, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. पंढरपूर येथे प्रांताधिकारी यांच्यासोबत वारकरी संप्रदायाची बैठक घेतली. त्यामुळे ही भूमिका मांडण्यात आली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.28) विधानभवन येथे देहू, आळंदीसह मानाच्या 7 पालखी सोहळा प्रमुखांची बैठक होणार आहे. आषाढी वारी संदर्भात चर्चा होणार असून वारकऱ्यांचे म्हणणे शासन दरबारी पोहोचवणार आहे.
यंदा दि.20 जुलै रोजी आषाढी
एकादशी असून दि.1 जुलै रोजी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, तर दि.2 जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान आहे. मात्र, अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यांत करोनाबाधितांची मोठी संख्या आहे.
अशा परिस्थितीत पुण्यासह सोलापूर, सातारा जिल्ह्यांतदेखील करोनाची साथ असल्याने यंदा आषाढी यात्रा कशी घ्यायची? हा प्रश्न सरकारपुढे आहे. मोजक्या वारकऱ्यांना पायी वारीस परवानगी द्यावी, करोना चाचणी करण्यात यावी, तसेच सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी वारकऱ्यांनी पंढरपूर प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.





