वाफगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर येथे ‘आनंददायी शनिवार’ या विशेष उपक्रमांतर्गत ‘खाऊ गल्ली व भाजी मंडई’ हा अभिनव व रंजक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, व्यवहारकौशल्य, पोषणआहाराची जाणीव तसेच जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास साधण्यात आला. या उपक्रमाची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी संयुक्तपणे आखली होती. विद्यार्थ्यांना आधीच मार्गदर्शन करून तयारी करून घेण्यात आली होती. प्रत्येक विद्यार्थी अथवा गटाने आपल्या घरी तयार केलेले घरगुती खाद्यपदार्थ व ताज्या भाज्यांचे स्टॉल्स उभारले होते. खाऊ गल्लीमध्ये पोहे, इडली, मंचुरियन, पावभाजी, खारे शेंगदाणे, चहा, पाणीपुरी, मेंदू वडा, ओली भेळ आदी पदार्थांची विक्री करण्यात आली. तर भाजी मंडईत कोथिंबीर, मेथी, पालक, करडई, आंबट चुका, टोमॅटो, वांगी, वाल, शेवग्याच्या शेंगा, कांदे, हिरव्या मिरच्या, पुदिना, आळू, मोड आलेली मटकी, हुलगे, वाटाणा आदी ताज्या व पौष्टिक भाज्या विक्रीस ठेवल्या होत्या.विद्यार्थ्यांनी भाव निश्चित करणे, ग्राहकांशी संवाद साधणे, व्यवहार पूर्ण करणे, स्वच्छता राखणे व स्टॉल व्यवस्थापन याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या उपक्रमातून पैशांचे व्यवहार, ग्राहक समाधान आणि व्यवस्थापन कौशल्य यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना उमगले. उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, पहिल्यांदाच स्वतःचा स्टॉल लावण्याचा अनुभव मिळाला. ग्राहकांनी आमचे पदार्थ आवडीने घेतले, याचा खूप आनंद झाला. पुढे उद्योजक व्हायची इच्छा निर्माण झाली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना व उद्योजकतेची आवड वाढल्याचे दिसून आले. पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने स्टॉल्सना भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे मुलांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष जीवनातील अनुभव मिळतो, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.