Food Safety – पिंपरी-चिंचवड शहरातील वेगाने वाढणाऱ्या नागरीकरणामुळे लोकसंख्येत मोठी वाढ होत असून, त्याचबरोबर दैनंदिन अन्नपदार्थांची मागणीही झपाट्याने वाढत आहे. विशेषतः चिकन आणि मासळी विक्री व्यवसायाने गेल्या काही वर्षांत मोठी झेप घेतली आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक, तसेच निवासी सोसायट्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर चिकन व मासे विक्रीची दुकाने, गाळे आणि तात्पुरते स्टॉल उभारले गेले आहेत. मात्र या वाढत्या व्यवसायामुळे अन्नसुरक्षा, स्वच्छता, कायदेशीर नियम आणि सार्वजनिक आरोग्य या मुद्द्यांवर नागरिकांमध्ये चिंता वाढताना दिसत आहे.स्थानिक नागरिकांच्या मते, या दुकानांमध्ये दिवसभर मोठी वर्दळ असते. सकाळपासून उशिरापर्यंत सुरू असलेल्या या व्यवसायामुळे ग्राहकांना सहज उपलब्धता मिळत असली, तरी काही ठिकाणी अस्वच्छता, कचऱ्याचा ढिग, सांडपाण्याची अयोग्य व्यवस्था आणि दुर्गंधी यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. “व्यवसाय वाढणे ही सकारात्मक बाब आहे; पण तो आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आणि नियमांनुसार आहे का?” असा सवाल नागरिकांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. अन्नसुरक्षेच्या नियमांवर प्रश्नचिन्ह चिकन आणि मासळी हे लवकर खराब होणारे अन्नपदार्थ असल्याने त्यांची योग्य साठवण अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र अनेक ठिकाणी आवश्यक तापमान नियंत्रण (कोल्ड चेन), स्वच्छ साठवणूक आणि प्रक्रिया याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. “मांस आणि मासळी योग्य तापमानात ठेवली जाते का? स्वच्छ पाणी आणि निर्जंतुक उपकरणांचा वापर होतो का?” याबाबत स्पष्टता नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी उघड्यावर मांस कापले जात असल्याचेही निदर्शनास येत असल्याने आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य परवाने आणि कागदपत्रांबाबत संभ्रम या व्यवसायातील सर्व दुकाने आवश्यक परवाने घेऊनच सुरू आहेत का, याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम आहे. दुकान नोंदणी (शॉप अॅक्ट), महापालिकेची परवानगी, तसेच अन्नसुरक्षा विभागाची नोंदणी (FSSAI) अनिवार्य असताना काही ठिकाणी तात्पुरत्या स्टॉल्समुळे नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप केला जात आहे. “प्रत्येक दुकानाने आपला परवाना दर्शनी भागात लावणे बंधनकारक असावे आणि त्याची नियमित तपासणी झाली पाहिजे,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कचरा आणि पर्यावरणीय परिणाम चिकन व मासळी विक्री व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर ओला कचरा आणि सांडपाणी निर्माण होते. अनेक ठिकाणी या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने दुर्गंधी, कीटकांचा त्रास आणि पर्यावरणीय प्रदूषण वाढत असल्याची तक्रार आहे. काही भागात नाल्यांमध्ये थेट सांडपाणी सोडले जात असल्याने सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा आणि पडताळणीचा मुद्दा या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर बाहेरील कामगार कार्यरत असल्याने त्यांच्या ओळखपत्रांची व पोलीस पडताळणीची गरज नागरिकांनी अधोरेखित केली आहे. “परिसरात सुरक्षितता आणि शिस्त राखण्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले जात आहे. प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा नागरिकांच्या मते, महापालिका, अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे नियमित तपासणी मोहीम राबवणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून इतरांसाठीही आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांच्या प्रमुख मागण्या -सर्व चिकन व मासे विक्री दुकानांची नियमित व सखोल तपासणी -प्रत्येक आस्थापनाकडे वैध परवाने व नोंदणी अनिवार्य करणे -अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे लागू करणे -कचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणा उभी करणे -सर्व कामगारांची ओळखपत्रे व पोलिस पडताळणी बंधनकारक करणे “खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या प्रत्येक आस्थापनासाठी संबंधित परवाना दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. यामध्ये मांस व मासे विक्री करणाऱ्या दुकानांचाही समावेश होतो. नियमांचे उल्लंघन झाल्यास अथवा कोणत्याही नागरिकाकडून तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा नियमांनुसार तात्काळ व योग्य ती कारवाई करण्यात येईल.” – महेश भोगावडे, संयुक्त आयुक्त -अन्न व औषध प्रशासन -पुणे विभाग