Purandar News : पुरंदर तालुक्यात लग्नसमारंभातील जेवणात विषबाधा; 62 हून अधिक नागरिक बाधित
Purandar News : प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर व उपकेंद्र गराडे येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णांवर उपचार सुरू केले.

सासवड : पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे व सोमर्डी परिसरात लग्नसमारंभातील जेवणातून अन्नविषबाधेचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
लग्न सोहळ्यात जेवण केलेल्या नागरिकांना अचानक उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, रबडी, भाजी, गुलाबजाम, बटाटावडा आदी पदार्थ खाल्ल्यानंतर अनेक नागरिकांची प्रकृती बिघडली. काही तासांतच रुग्णसंख्या वाढत गेल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली.
प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर व उपकेंद्र गराडे येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णांवर उपचार सुरू केले. गंभीर रुग्णाना सासवडला हलवले तर १२ रुग्णांना आय.व्ही. उपचार देण्यात आले असून उर्वरित रुग्णांवर स्थानिक पातळीवर उपचार सुरू आहेत.
बाधित रुग्णांचा आकडा
एकूण रुग्ण : ६२
अॅडमिट : २८
घरी सोडले : ३८
सोमर्डीतील रुग्ण स्थिती
मोरया हॉस्पिटल : १० (२ अॅडमिट)
युनिटी हॉस्पिटल : २ (२ अॅडमिट)
धन्वंतरी हॉस्पिटल : २ (सर्व बरे)
जनहितार्थ हॉस्पिटल : ३१ (२० अॅडमिट)
नाझरे सुपेतील रुग्ण स्थिती
ग्रामीण रुग्णालय जेजुरी : २ खाजगी दवाखाना : १
प्रा. आ. केंद्र बेलसर : २
घरभेटीद्वारे उपचार : १२
घरोघरी सर्वेक्षण सुरू
आरोग्य विभागाने गावात घरोघरी सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून किरकोळ लक्षणे असलेल्या नागरिकांवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.





